मंत्रालयात आमदार अक्षय कर्डिले यांची दमदार धडक; रस्ते, वीज, पाणी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी सरकारकडे जोरदार पाठपुरावा
अहिल्यानगर प्रतिनिधी :
राहुरी-नगर-पाथर्डी मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्नांसाठी आमदार अक्षय कर्डिले यांनी मंत्रालयात धडक देत राज्यातील वरिष्ठ मंत्र्यांची भेट घेत मतदारसंघाच्या विकासाचा मुद्दा जोरदारपणे मांडला. रस्ते, वीज, पाणी, सिंचन आणि शेतकऱ्यांच्या अडचणींसह विविध विकासकामांसाठी भरघोस निधीची मागणी त्यांनी यावेळी केली. आमदार कर्डिले यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी विभागातील वरिष्ठ मंत्री तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व अहिल्या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेत राहुरी, नगर आणि पाथर्डी तालुक्यातील प्रश्नांची सविस्तर माहिती दिली व निवेदने सादर केली.
मतदारसंघातील अनेक गावांमध्ये रस्त्यांची दुरवस्था झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे कर्डिले यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीसह नवीन रस्त्यांसाठी विशेष निधी मंजूर करण्याची मागणी त्यांनी केली. यासोबतच शेतीपंपांना नियमित आणि पुरेसा वीजपुरवठा मिळावा, पाणीटंचाईच्या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात तसेच सिंचन प्रकल्पांना गती देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. शेतकऱ्यांच्या हिताच्या योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनाला आवश्यक सूचना देण्याची विनंती त्यांनी मंत्र्यांकडे केली. मतदारसंघातील विकासकामांना गती देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करताना आमदार कर्डिले यांनी राहुरी-नगर-पाथर्डी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने विशेष लक्ष देणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले. दरम्यान, विविध प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका घेत संबंधित विभागांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात येतील, असे आश्वासन मंत्र्यांकडून देण्यात आल्याची माहिती आमदार कर्डिले यांनी दिली.
मुख्य मागण्या मतदारसंघातील रस्ते विकासासाठी विशेष निधी,शेतीपंपांना नियमित वीजपुरवठा,पाणीटंचाईग्रस्त भागांसाठी तातडीच्या उपाययोजना,सिंचन प्रकल्पांना गती देण्याची मागणी,शेतकऱ्यांच्या हिताच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी,राहुरी-नगर-पाथर्डी मतदारसंघासाठी विकासकामांसाठी भरघोस निधी मंजूर करण्याची मागणी असं अनेक मागण्या त्यांनी केले


