बीड जिल्ह्यातील टाकळी गावातील विलास घुले हत्या प्रकरणामुळे सध्या राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलंच तापलं आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी अत्यंत महत्त्वाची आणि आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. विलास घुले हत्या प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने केवळ वरवरचा तपास न करता या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाणे गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.
घुले कुटुंबावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही, असा ठाम विश्वास जरांगे पाटील यांनी दिला. घुले प्रकरणाशी संबंधित एका महिलेने माध्यमांसमोर येऊन अत्यंत खळबळजनक दावे आणि आरोप केले होते. या सर्व घडामोडींनंतर मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना ही महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वीच्या एका प्रकरणाचा दाखला देत पोलिसांच्या आणि एसआयटीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, “यापूर्वी महादेव मुंडे प्रकरणात देखील एसआयटी स्थापन करण्यात आली होती. मात्र तिथे केवळ थातूरमातूर तपास झाला. या घुले हत्येच्या प्रकरणात एसआयटीला एकतर्फी काम करता येणार नाही. जर या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा दोषी असेल तर सत्य काय आहे ते समोर येईलच. कायद्यानुसार जी कारवाई व्हायची ती होईल.”
यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्षपणे जोरदार निशाणा साधला. आम्ही परळीवाल्यांसारखे आरोपी लपवत नाही. त्यांनी खून करूनही तो केला नाही असं म्हटलं. पण तशी नियत आमची नाही. आम्ही मराठे कधीही असं वागत नाही, असा टोला त्यांनी लगावला.
घुले कुटुंबाला जर आमची मदत लागली तर आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. पण परळीवाल्यांचे ऐकून तुम्ही कोणावरही खोटे आरोप करू नका, असं जरांगे म्हणाले.


