आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि देशांतर्गत परिस्थितीमुळे सोने आणि चांदीच्या किमतीत सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. आज (३० जून २०२६) सोन्याच्या किमतीत १६०० रुपयांची घसरण नोंदवली गेली, तर चांदी २००० हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे. मौल्यवान धातूंचे भाव कोसळत असल्याने सामान्य गुंतवणूकदार आणि खरेदीदारांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे.बुलियन बेलसाईटनुसार, सोन्याच्या किमती १६०० रुपयांनी घसरल्याने सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,४१,२१० रुपयांवर आला आहे. तर चांदीच्या दरातही आज २००० रुपयांची कपात पाहायला मिळाली. यामुळे चांदीचा प्रति किलोचा दर २,२१,०८० रुपयांवर खाली आला आहे.गेल्या आठवड्याचा विचार केला तर बाजारात मोठी पडझड झाल्याचे दिसते. गेल्या आठवड्यात सोन्याचा दर १,४६,७८०.०० रुपये होता, जो आता सुमारे ५,५७० रुपयांनी घसरला आहे. तर चांदी गेल्या आठवड्यात २,२६,३८०.०० रुपयांवर व्यापार करत होती. आजच्या २,२१,०८० रुपयांच्या दराशी तुलना केल्यास चांदी एका आठवड्यात ५,३०० रुपयांनी स्वस्त झाली आहे.
मौल्यवान धातूच्या किमती कोसळण्यामागे आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत दोन्ही कारणे आहेत.
इराण-अमेरिका यांच्यातील शांतता कराराने सुरक्षित गुंतवणूक असलेल्या सोन्याची मागणी घटली आहे.
अमेरीकेची फेडरल बँक व्याजदर दीर्घकाळात चढेच ठेवणार असल्याच्या शक्यतेने गुंतवणूकदार आता रोख्यांमध्ये गुंतवणूक करत आहे. कारण, सोन्याच्या गुंतवणुकीतून कोणतेही व्याज मिळत नाही.
उच्च किमतीला केलेल्या नफावसुलीनेही सोन्याच्या किमती घसरताना पाहायला मिळत आहेत.
भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभर सोने खरेदी थांबवण्याचे आवाहन आणि आयात शुल्कात दुप्पट वाढ केल्याचा मागणीवर परिणाम झाला. मे महिन्यात सोन्याच्या आयातीत थेट ७० टक्के घट झाली आहे.
औद्योगिक मागणीतील अनिश्चितता वाढल्याने चांदीचीही मागणी घटली आहे. याचा थेट परिणाम चांदीच्या किमतींवर होत आहे.


