कर्जत: गटनेता व नगराध्यक्षांवरील अविश्वास ठरावाच्या जिल्हा प्रशासनाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या दोन्ही याचिका छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने फेटाळून लावल्या. दहा दिवसात अविश्वास ठरावावर कार्यवाही करावी, असे निर्देश खंडपीठाने दिले. त्यामुळे आता कर्जत नगरपंचायत नगराध्यक्षांविरोधात अविश्वास सभा होण्याचा मार्गही मोकळा झाला.
गटनेता बदलाच्या निर्णयाला संतोष मेहेत्रे यांनी तर अविश्वास प्रस्तावाला नगराध्यक्षा रोहिणी घुले यांनी छत्रपती संभाजीनगर खंडपीठात आव्हान दिले होते. न्यायमूर्ती अजीत बी. कडेठाणकर व न्यायमूर्ती किशोर सी. संत यांच्यासमोर त्याची बुधवारी सुनावणी झाली. या सुनावणीत खंडपीठाने घुले व मेहेत्रे या दोघांच्याही याचिका फेटाळल्या. त्यामुळे अविश्वास ठराव व गटनेता बदलाचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कायम राहिला. जिल्हाधिकाऱ्यांनी दहा दिवसाच्या आत नगराध्यक्षावरील अविश्वास प्रस्तावा बाबत कार्यवाही करावी असा निकाल खंडपीठाने दिल्याची माहिती ॲड. अभिजीत आव्हाड यांनी दिली.कर्जत नगरपंचायत मध्ये गटनेता बदल होत सतीश पाटील यांची निवड झाली. या निवडीला मेहत्रे यांनी छत्रपती संभाजीनगर खंडपीठांमध्ये याचिका दाखल करून आव्हान दिले होते. नगराध्यक्ष रोहिणी घुले यांनी त्यांच्यावर दाखल अविश्वास प्रस्तावाला आव्हान दिले होते. खंडपीठाने दोघांचेच्याही याचिका फेटाळल्या. तेरा नगरसेवकांच्यावतीने ॲड. अभिजीत आव्हाड, ज्येष्ठविधीज्ञ राजेंद्र देशमुख ॲड. नितीन गवारे, ॲड. गोरक्ष पालवे, ॲड.अनिल साखरे, ॲड.गिरासे यांनी बाजू मांडली.
रिट याचिका ५३१५/२०२६ आणि रिट याचिका ५७९७/२०२६ या फेटाळण्यात येत आहेत. याचिकांमध्ये तसेच संबंधित दिवाणी अर्जांमध्ये यापूर्वी पारित करण्यात आलेले सर्व अंतरिम आदेश या अंतिम आदेशात विलीन (Merged) करण्यात येत आहेत. प्रलंबित इतर सर्व दिवाणी अर्ज निकाली काढण्यात येत आहेत. महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत व औद्योगिक वसाहती अधिनियम, १९६५ मधील कलम ३४१-ब(५) अन्वये मागणी करण्यात आलेल्या अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी स्थगित करण्यात आलेली विशेष सभा आजच्या दिनांकापासून १० दिवसांच्या आत पुनर्नियोजित करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येत आहेत.


