अयोध्या येथील राम मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये, दान केलेल्या निधीच्या अपहारप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आठ जणांपैकी किमान पाच जण पैशांची मोजणी करताना नोटा लपवत असल्याचं समोर आलं आहे. अयोध्या पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिराच्या पिलग्रिम फॅसिलिटी सेंटरमधील ४५ दिवसांच्या फुटेजची कसून तपासणी केल्यावर, पैशांची मोजणी करणाऱ्या पाच कर्मचाऱ्यांनी नोटांचे बंडल काढून ते स्वतःच्या कपड्यांमध्ये किंवा सॉक्समध्ये लपवल्याचं उघड झालं. दरम्यान, ज्या एजन्सीमार्फत या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती, त्या एजन्सीने या कर्मचाऱ्यांची निवड आपण केली नसल्याचा दावा केला आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
टिनू यादव हे ट्रस्टचे माजी सरचिटणीस चंपत राय यांचे माजी वाहनचालक असून मनिष यादव हा टिनू यांचा पुतण्या आहे. अनुकल्प मिश्रा, लवकुश मिश्रा, अविनाश शुल्का आणि मनिष यादव यांच्याशी संबंधित ठिकाणांवरून रोख रक्कम जप्त केल्याचं सूत्रांनी सांगितलं. मंदिरात विविध दानपेट्यांमध्ये जमा झालेले पैसे मोजण्यासाठी ट्रस्टने सुमारे ५० लोकांना कामावर ठेवले होते. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं, “पैशांची मोजणी सुरू असताना पाच व्यक्ती पैशांच्या ढिगातून नोटांचं बंडल लंपास करताना, कपड्यांमध्ये लपवताना किंवा सॉक्समध्ये कोंबताना स्पष्ट दिसत आहेत. या व्यक्तींच्या मालमत्तांवर केलेल्या छाप्यातून आधीच पैसे जप्त करण्यात आले आहेत. दुर्दैवाने, मंदिर प्रशासन ४५ दिवसांपेक्षा जास्त जुने सीसीटीव्ही फुटेज जतन करत नाही. त्यामुळे हा प्रकार नक्की किती काळापासून सुरू होता, हे आम्ही निश्चितपणे सांगू शकत नाही.”चोरीच्या पैशांमधून कोणतीही मालमत्ता किंवा संपत्ती खरेदी केली आहे का, हे तपासण्यासाठी पोलीस आता आरोपींशी संबंधित ठिकाणांवरून जप्त केलेल्या कागदपत्रांची छाननी करत आहेत, असं या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. “आम्ही देणगीचे पैसे लांबवण्याच्या इतर मार्गांचाही शोध घेत आहोत. अगदी बँकेचे कर्मचारीही आता संशयाच्या भोवऱ्यात आहेत”, असंही अधिकारी म्हणाले. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आठ जणांपैकी सहा जणांची नियुक्ती स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) वाराणसीस्थित सैनिक सिक्युरिटीज या मनुष्यबळ पुरवठा एजन्सीमार्फत केली होती. सैनिक सिक्युरिटीजचे संचालक गौरव सिंग यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं की, त्यांची एजन्सी बँक व इतर संस्थांना केवळ हाऊसकीपिंग कर्मचारी पुरवते. आम्ही बँकेशी संबंधित कर्मचारी पुरवत नाही, तर हाऊसकीपिंग कर्मचारी देतो. बँक किंवा संबंधित फर्म त्या कर्मचाऱ्यांचा वापर कशासाठी करते, हे त्यांच्यावर अवलंबून असतं”, असं ते म्हणाले.


