पुण्यातील लो केतन अग्रवाल खून प्रकरणात आता एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी माहिती समोर आली आहे. या संपूर्ण खुनाचा कट आणखी एका तरुणाला आधीपासूनच माहिती होता, असा खळबळजनक खुलासा तपासातून झाला आहे. हा नवा ट्विस्ट समोर आल्यामुळे पुणे पोलिसांच्या तपासाला आता एक वेगळीच दिशा मिळाली असून संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, समोर आलेला हा तिसरा तरुण मुख्य आरोपी चेतन चौधरी याचा वर्गमित्र (Classmate) आहे. केतन अग्रवाल याच्या खुनाचा कट कसा रचला गेला, याचे प्लॅनिंग काय होते, याबाबत चेतन चौधरी आणि त्याची मैत्रीण सिया या दोघांनीही या वर्गमित्रासोबत आधीच सविस्तर चर्चा केली होती.
लोहगडावर केतनचा खून करण्यात आला, तिथे सोबत चालण्यासाठी चेतन आणि सियाने या तरुणाकडे प्रचंड आग्रह धरला होता. पण काही कारणास्तव तो तरुण १८ जून रोजी त्यांच्यासोबत लोहगडावर गेला नाही, अशी माहिती आता समोर आली आहे. जर तो तरुण त्या दिवशी सोबत गेला असता, तर या प्रकरणाला वेगळे वळण लागले असते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.या संपूर्ण प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा आणि संशयास्पद मुद्दा म्हणजे, लोहगडावर केतन अग्रवाल याचा खून केल्यानंतर मुख्य आरोपी चेतन चौधरी हा सर्वात आधी याच आपल्या वर्गमित्राला जाऊन भेटला होता. त्यामुळे खुनानंतर नक्की काय घडले, आरोपींची पुढील रणनीती काय होती, याचे अनेक महत्त्वाचे धागेदोरे या तरुणाकडे असण्याची दाट शक्यता आहे.आता या तरुणाला खुनाच्या कटाची आधीपासून कल्पना असूनही त्याने पोलिसांना किंवा इतरांना का कळवले नाही? आणि खुनानंतर चेतन त्यालाच का भेटायला गेला? या प्रश्नांचा शोध आता पुणे पोलीस घेत आहेत. या नव्या खुलाशामुळे आगामी काळात या प्रकरणात आणखी काही मोठ्या अटकेची शक्यता नाकारता येत नाही.


