अमेरिका- इराणमध्ये पुन्हा युद्धाचा भडका उडाला. या युद्धाच्या वाढत्या तीव्रतेमुळे मध्य-पूर्वेतील तणाव वाढत चालला आहे. या नव्याने सुरू झालेल्या संघर्षामुळे पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किमतीतही वाढ झाली आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने पेट्रोल आणि डिझेलबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने डिझेल आणि विमान इंधनाच्या निर्यातीवरील विंडफॉल टॅक्स म्हणजे इंधनावरील करवाढीमध्ये लक्षणीय वाढ केली आहे. केंद्र सरकारने डिझेल आणि विमान इंधनाच्या निर्यातीवरील कर प्रति लिटर ७ रुपयांनी वाढवला. कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे ही करवाढ करण्यात आल्याचे केंद्र सरकारने सांगितले.
रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, सरकारने डिझेल निर्यातीवरील कर प्रति लिटर ८.५ रुपयांवरून १५.५ रुपयांपर्यंत वाढवला आहे. तर एव्हिएशन टर्बाइन फ्युएलवरील विंडफॉल टॅक्स प्रति लिटर ७.५ रुपयांवरून १४.५ रुपयांपर्यंत वाढवला आहे. हे वाढीव कर दर १६ जुलैपासून लागू झाले आहेत. मात्र, पेट्रोलवरील विंडफॉल टॅक्स प्रति लिटर ४ रुपयाने कमी करण्यात आला आहे. हा कर अलीकडेच कमी करण्यात आला आहे.
चिंताजनक असणारी जागतिक परिस्थिती आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे सरकारने यापूर्वीही अनेक वेळा असेच निर्णय घेतले आहेत. जुलैमध्ये जेव्हा अमेरिका-इराण युद्ध काही काळासाठी शांत झाले होते तेव्हा सरकारने पेट्रोल निर्यातीवरील विंडफॉल टॅक्स वाढवला होता. तर डिझेल आणि एटीएफवरील कर कमी केला होता. पण आता १६ जुलैपासून तो पुन्हा वाढवण्यात आला आहे.
पेट्रोल आणि डिझेलवरील कर वाढवण्याच्या या निर्णयामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होईल का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. पण त्यांना चिंता करण्याचे कारण नाही. कारण पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार नाहीत. कारण विंडफॉल टॅक्स हा सरकारद्वारे कंपन्या किंवा उद्योगांवर लादलेला एक अतिरिक्त कर आहे. देशांतर्गत बाजारात इंधनाची उपलब्धता सुनिश्चित करणे आणि निर्यातदारांना आंतरराष्ट्रीय किमतींचा गैरफायदा घेण्यापासून रोखणे, हे या कराचे उद्दिष्ट आहे. म्हणजे सरकारच्या या निर्णयामुळे देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ होणार नाही.
दरम्यान, आज देशात पेट्रोल- आणि डिझेलचे दर किती आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. नवी दिल्लीत पेट्रोल १०२.१२ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९५.२० रुपये प्रति लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा भाव ११३.४८ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा भाव ९९.८२ रुपये प्रति लिटर आहे. तर मुंबईत पेट्रोल १११.२१ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९७.८३ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहेतर चेन्नईमध्ये पेट्रोल १०७.७८ रुपये आणि डिझेल ९९.५६ रुपये प्रति लिटर आहे.


