अहिल्यानगर- देवस्थानातील बाथरूममध्ये एका साधूने भयंकर कृत्य केले. बाथरूममध्ये एका महिलेसोबत हा साधू नग्न अवस्थेत आढळून आला. ही घटना उघड होताच एकच खळबळ उडाली. या साधूविरोधात अद्याप कोणतिही कारवाई करण्यात आली नाही. तसंच पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला नाही त्यामुळे गावकरी संतप्त झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मढी येथे ही घटना घडली. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री चैतन्य कानिफनाथ मंदिर देवस्थानमध्ये हा प्रकार घडला. देवस्थानाच्या बाथरूममध्ये एका तथाकथित साधूला नग्न अवस्थेत महिलेसोबत पकडण्यात आले. या घटनेमुळे मढी गावात एकच खळबळ उडाली. या घटनेचा व्हिडिओ मढी गावचे सरपंच संजय मरकड यांनी समाज माध्यमांना दिला.
हा साधू आणि ती महिला एकत्र गेले होते की त्या महिलेला त्याने बळजबरी बाथरूममध्ये नेले होते? याबाबत अद्याप कोणतीही माहिती हाती आलेली नाही. या प्रकरणी पोलिस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. मात्र देवस्थानच्या परिसरामध्ये हा प्रकार घडल्यामुळे भाविकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. मढी गावचे सरपंच संजय मरकड यांनी याबाबत देवस्थानच्या ट्रस्टींना दोषी ठरवत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
एवढी मोठी घटना देवस्थानच्या परिसरात घडूनही देवस्थानचे ट्रस्टी तोंडाला पट्टी लावून बसले आहेत. त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी होऊन ट्रस्टींसह साधूवर गुन्हा दाखल करावा आणि त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सरपंच संजय मरकड यांनी केली आहे. या घटनेनंतर गावकरी आक्रमक झाले आहेत.


