वादग्रस्त कॅप्टन खरात विरोधात 17 हुन अधिक गुन्हे दाखल आहेत. खरात याच्या पैशांतून कल्पना खरात हिने हवाला द्वारे संपत्ती खरेदी केल्याचा आरोप आहे. तिच्या विरोधात शिर्डी पोलिसांत गुन्हा दाखल होता. वादग्रस्त तांत्रिक कॅप्टन अशोक खरात याच्या विरोधात नाशिक, सिन्नर आणि शिर्डी सह 17 गुन्हे दाखल आहेत. यासंदर्भात राज्य शासनाच्या विशेष तपास पथकाने त्याची चौकशी करून शासनाला अहवाल सादर केला होता. यामध्ये विविध पतसंस्थांच्या 17 कोटी हून अधिक निधीचा बेनामी वापर केल्याचा गंभीर आरोप होता. कॅप्टन खरात याच्या कोपरगाव येथील समता पतसंस्था तसेच कुंदेवाडी (सिन्नर) येथील श्री जगदंबा माता पतसंस्थेतील बेचाळीस बनावट खात्यांद्वारे पैसे काढण्यात आल्याचा आरोप होता.
यामध्ये 14 कोटी रुपयांचे बेनामी व्यवहार झाले. पैसा बेकायदेशीर मार्गाने पत्नी कल्पना खरात हिच्या नावे वळविण्यात आल्याचा गुन्हा दाखल होता. आज दुपारी कल्पना खरात ही आपल्या वकिलासह शिर्डी पोलिसांत हजर झाली. शिर्डी पोलिसात समता पतसंस्थेतील पैशांचा अपहार आणि बनावट खात्यातील निधीचा हवाला रॅकेट द्वारे विनियोग केल्याचा गुन्हा कल्पना खरात हिच्या विरोधात दाखल होता
कल्पना खरात हिने यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे अटकपूर्व जामीनासाठी प्रयत्न केले होते. त्याआधी जिल्हा न्यायालयात केलेला जामीनाचा प्रयत्न यशस्वी झाला होता. गेले काही दिवस शिर्डी पोलिसांनी कल्पना खरात हिला तपासासाठी हजर राहण्याचे नोटीस बजावली होती.
कल्पना खरात हिच्या नावे सत्तरहून अधिक मालमत्ता आहेत. सुमारे 1000 कोटी रुपयांच्या या मालमत्ता असल्याचा दावा केला जातो. शिर्डी, पुणे, नाशिक आणि अन्य शहरांमध्ये कल्पना खरात यांच्या नावे तांत्रिक खरात याने बेनामी संपत्ती द्वारे जमिनी व मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप आहे. कल्पना खरात ही पोलिसात हजर झाल्याने या प्रकरणातील राजकीय नेते आणि अन्य गुंतवणूकदार यांच्या सहभागाबाबत पोलिसांना माहिती मिळण्याचा मोकळा झाला आहे.


