मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या एका वाक्यानं मनं जिंकली

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने निघालेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज पहाटे २० दिवसांपासून सुरू असलेले उपोषण सोडले. सरकारच्या शिष्टमंडळाने बीडमधील पाटोदा येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत त्यांची मनधरणी केली. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री दादा भुसे, आमदार सुरेश धस, आमदार प्रसाद लाड आणि बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज सकाळी मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधला. यानंतर सकाळी ६ वाजता पत्रकार परिषद घेऊन उपोषण सोडल्याची घोषणा करण्यात आली.

सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या मागण्या पूर्ण कराव्यात यासाठी सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिला. या काळात मागण्या पूर्ण न केल्यास आम्ही मुंबई गाठणार, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. उपोषण आज स्थगित करत असलो तरी आंदोलन सुरूच राहणार, असेही मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.मनोज जरांगे पाटील पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या समर्थकांना आवाहन करताना म्हणाले, “तीन वर्षांपासून आपण आरक्षणासाठी लढत आहोत. आता सरकारला आणखी तीन महिने देऊ. तीन वर्ष तीन महिने आपण लढत आहोत, असे समजू. सरकारवर आपण विश्वास ठेवत असलो तरी हे आंदोलन सुरूच राहणार आहे. ९० दिवस थांबलो तरी काहीही फरक पडणार नाही. आपण ही शेवटची फसवणूक समजू. सरकारला हे तीन महिने शेवटचे देऊ.”

मनोज जरांगे पाटील मुंबईत आंदोलन करण्यासाठी निघालेले असताना पाटोदा येथे त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे पाटोदा येथे विठ्ठल मंदिराच्या भक्तनिवासमध्ये त्यांना सलाईन लावण्यात आले. अंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघाल्यानंतर, १२ सप्टेंबरपासून त्यांनी सलाईन घेणे बंद केले होते. त्यांना हात-पाय हलवणे देखील कठीण झाले होते. त्यामुळे त्यांनी उपचार घ्यावेत, अशी मागणी मराठा समाजातील आंदोलक करत होते.

“मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा संघर्ष करण्याची वेळ येणार नाही, अशा पद्धतीने शिंदे समिती काम करेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांनी मराठा समाजाच्या मागणीला सकारात्मक पाठिंबा दिला. भविष्यातही समन्वयाने काम करूयात. मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित केलं. सरकारच्या शब्दाला मान दिलं. वेळोवेळी चर्चा सुरूच राहणार आहे. जे काही प्रश्न निर्माण होतील, त्यातून मार्ग काढू. सरकारच्या वतीने, सोबत मंत्री दादा भुसे, आमदार प्रसाद लाड, आमदार सुरेश धस यांच्या सर्वांच्या वतीने, उपसमितीच्या वतीने आभार व्यक्त करतो. जरांगे पाटील यांना जे आश्वासन दिलं आहे. त्याची पूर्तता करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, याची खात्री देतो.” मंत्री आणि मंत्रिमंडळ मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी अशी सरकारची बाजू मांडली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles