राहुरी तालुक्यात हनीट्रॅपचा धक्कादायक प्रकार ; महिलेने तरुणाला ब्लॅकमेल केलं

मैत्रीच्या संबंधांचा गैरफायदा घेत महिलेने तरुणाला हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकवून ब्लॅकमेल केल्याचा प्रकार समोर आला आहे. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर संबंधित महिलेने साथीदारांसह घरात घुसून तरुणाला मारहाण करत जबरदस्तीने औषध पाजून मोबाईल आणि ११ हजार रुपयांची रोकड हिसकावून घेतल्याचा आरोप पीडित तरुणाने केला आहे.राहुरी तालुक्यातील कानडगावच्या पिडित तरूणावर हा प्रसंग गुदरला आहे. तो शेती व्यवसायासह जनावरांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतो. दोन वर्षांपूर्वी त्याची शिर्डी येथील महिलेशी मैत्री झाली. त्यांच्यात नियमित संभाषण सुरू झाले. मात्र, या मैत्रीचा गैरफायदा घेत संबंधित महिलेने त्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून वेळोवेळी हजारो रुपये उकळले. पैशांसाठी ब्लॅकमेल केल्याचा आरोप तरुणाने केला आहे.

९ नोव्हेंबर रोजी रात्री महिलेने फोन करून त्याच्याकडे पैशांची मागणी केली. मात्र, त्याने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर तिने त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तरुणाचे म्हणणे आहे. १० नोव्हेंबर रोजी पहाटे महिला आणि तिच्यासोबत आलेल्या पाच जणांनी त्याच्या घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला.

मोबाईल आणि ११ हजार रुपये रोख रक्कम काढून घेत त्याला बेदम मारहाण करत तोंडात जबरदस्तीने काहीतरी औषध ओतल्याचा आरोप करण्यात आला आहे. तरुणावर लोणी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लोणी, राहुरी पोलीस तसेच ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून घटनेची माहिती दिल्याचे सांगितले आहे. मात्र, अद्याप पोलिसांकडून दखल घेण्यात आली नसल्याचा आणि गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप त्याने केला आहे. आपल्या जिवाला धोका असल्याचे सांगत या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, संशयितांचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी आणि आपल्याला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्या तरुणाने केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles