पारनेर तालुक्यातील तलाठीला लाच घेताना अटक
तक्रारदार हे पाडळी आळे, ता.पारनेर येथील रहिवासी आहेत. तक्रारदार यांच्या आत्या ह्या शेजारच्या कळस ता.पारनेर या गावच्या मूळ रहिवासी असून त्या अशिक्षित आहेत. कळस येथे तक्रारदार यांच्या आत्याचे पती यांचे नावे शेत जमिनीचे गट क्रमांक 37 व गट क्रमांक 48 असे दोन गट आहेत. तक्रारदार यांच्या आत्याचे पती हे दिनांक 6/8/2023 रोजी मयत झाले होते. तक्रारदार यांचे आत्याच्या पतीच्या नावे असलेल्या शेत जमिनीला वारसदार आहेत. सदर शेत जमिनीला वारस नोंद लावण्यासाठी पाडळी आळीचे तलाठी यांच्याकडे सर्व संबंधित कागदपत्रे एक महिन्यापूर्वी जमा केली होती. तक्रारदार यांच्या आत्या ह्या अशिक्षित तसेच वयोवृद्ध असल्याने व तक्रारदार यांचा आते भाऊ हा पनवेल नवी मुंबई येथे वास्तव्यास असल्याने त्यांच्या कळस येथील शेत जमिनी बाबतच्या वारस नोंदीच्या कामाचा पाठपुरावा करण्यासाठी तक्रारदार यांच्या आत्या यांनी तक्रारदार यांना अधिकार पत्र दिले आहे. सदर वारस नोंद लावण्याकरिता लोकसेवक घोरपडे, तलाठी सजा पाडळी आळे यांनी 5000/- रुपये लाचेची मागणी केले बाबतची तक्रार दि.24/03/2025 रोजी ला.प्र.वि. अहिल्यानगर येथे प्राप्त झाली होती. सदर लाच मागणी तक्रारीच्या अनुषंगाने दि.24/03/2025 रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली. लाच मागणी पडताळणी दरम्यान आरोपी लोकसेवक आशीर्वाद प्रभाकर घोरपडे, तलाठी सजा पाडळी आळे, ता.पारनेर यांनी पंचा समक्ष तक्रारदार यांचेकडे शेत जमिनीची वारस नोंद लावण्यासाठी 3,000/- रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. दि.24/03/2025 रोजी पाडळी आळे, तलाठी कार्यालय, ता.पारनेर, जिल्हा अ.नगर येथे आयोजित सापळा कारवाई दरम्यान आरोपी लोकसेवक घोरपडे यांनी तक्रारदार यांचे कडून 3,000/- रुपयाची लाच स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांचे विरुद्ध पारनेर पोलीस ठाणे, जिल्हा अ.नगर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.पुढील तपास पोलीस उपअधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर करत आहेत


