नाशिकच्या मालेगावमधील ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करण्यात आले, त्यानंतर त्या मुलीची हत्या देखील करण्यात आली. ही घटना ताजी असतानाच नांदेडमधून शिक्षकीपेशाला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका हैवान शिक्षकाने तब्बल ७ वर्षाच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केला आहे. धक्कदायक म्हणजे ही मुलगी ज्या शाळेत शिकत होती त्याच शाळेत आरोपी शिक्षक म्हणून काम करत होता. या घटनेनंतर पोलिसांनी नराधम शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना ही नांदेड शहरात घडली असून काल म्हणजेच २० नोव्हेंबर रोजी पीडित अल्पवयीन मुलगी शाळेत जाण्यास कुटुंबियांना नकार देत होती. रोज आवडीने शाळेत जाणारी मुलगी आज शाळेत जायला नकार देत असल्याने तिच्या आईने तिला सतत विचारणा केली. तरीही मुलगी गप्प बसल्याने आईने प्रेमाने तिला जवळ घेऊन विचारल्यानंतर शिक्षकाने केलेला प्रकार तिने सांगितला.
घडलेला प्रकार ऐकून पीडित मुलीची आई संतापली. तिने तातडीने पोलीस स्टेशन गाठले. त्या हैवान शिक्षकाविरोधात भाग्यनगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून आरोपी शिक्षक विशाल लोखंडे ( vishal lokhande ) याच्यावर 64(2), 65(2) ,351(2) Bns , 468 पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान आरोपी शिक्षकास अटक करण्यात आली असून हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवण्याची विनंती न्यायालयाला करणार असल्याची प्रतिक्रिया उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैजंने यांनी दिली आहे. शिवाय या घटनेचा तपास सुरु असून विद्येचं मंदिर असलेल्या शाळेतसुद्धा मुली सुरक्षित नाहीत ही धक्कादायक बाब समोर आली आहे.


