व्यावसायिकाने विकत घेतलेले घर बँकेने लिलावात काढले
अहिल्यानगर-शहरातील एका व्यावसायिकाची तब्बल १० लाख ८१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. कर्जबाजारी घर विकत घेतल्याचा प्रकार घराच्या लिलावानंतर उघडकीस आला. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात संतोष कचरू साळुंके (रा. भूषण नगर, केडगाव) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गणेश रामदास गोरे (वय ३७, रा. संदेशनगर, पाईपलाईन रोड) यांनी फिर्यादी दिली. त्याच्या माहितीनुसार, साळुंके याने तपोवन रोड येथील घर विक्रीस काढले होते. दोघांमध्ये १० लाख २० हजार रुपयांत व्यवहार ठरला. गोरे यांनी १० ऑक्टोबर २०२२ रोजी ७ लाख ४२ हजार रुपये रोख, तर २ लाख ७८ हजार रुपये फोन-पे द्वारे साळुंकेला दिले. त्याच दिवशी खरेदीखतही करण्यात आले, ज्यासाठी गोरे यांनी ६१ हजार २०० रुपये खर्च केला. त्यानुसार, दुसऱ्या दिवशी घराचा ताबा दिला जाणार होता. मात्र, साळुंके याने सातत्याने ताबा देण्यास टाळाटाळ केली. सहा महिने उलटूनही काहीच हालचाल न झाल्याने गोरे यांनी पोलिसांत तक्रार देण्याचा इशारा दिला. तेव्हा साळुंके याने मी सरकारी नोकर आहे, सर्व कर्ज फेडून ताबा देतो, असे सांगून गोरे यांचा विश्वास संपादन केला. पण जेव्हा गोरे घराचा ताबा घेण्यासाठी गेले, तेव्हा घरावर एका बँकेचे ४३ लाख रुपयांचे कर्ज थकबाकीची नोटीस लागलेली दिसली. यामुळे मोठा धक्का बसले. पुढे माहिती घेतल्यावर समजले की, साळुंके याने कर्ज न फेडल्याने बँकेने घर लिलावात काढले, आणि गोरे यांचे सर्व पैसे बुडाले. शेवटी फसवणुकीची जाणीव झाल्यावर गोरे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस अधिक तपास करत आहेत.
नगर-शहरातील व्यावसायिकाची फसवणूक ….विकत घेतलेले घर बँकेने लिलावात काढले
- Advertisement -


