अहिल्यानगर -आरोग्यास धोका पोहोचविणार्या प्रकारावर कोतवाली पोलिसांनी कारवाई करताना एका पेरू विक्रेत्याला ताब्यात घेत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तौफिक लतीफ बागवान (वय 26 रा. गजानन कॉलनी, मुकुंदनगर, अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील केडगाव शिवारात रंगोली चौकाजवळ रविवारी (7 सप्टेंबर) दुपारी हा प्रकार उघडकीस आला.मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना एका व्यक्तीने व्हिडीओ पाठवून कळविले की, रस्त्याच्या कडेला पेरू विकणारा इसम पेरूवरची धूळ थुंकी लावून स्वच्छ करत असून त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. ही माहिती मिळताच त्यांनी पोलीस उपनिरीक्षक देशमुख, पोलीस अंमलदार राहुल मासाळकर व दोन पंच यांच्यासह पथक घटनास्थळी पाठविले. तेथे पोलीस पथकाला तौफिक बागवान हा रस्त्याच्या कडेला पेरू विक्री करताना दिसला.
त्यावेळी त्याने पेरूंवर बसलेली धूळ स्वतःच्या थुंकीने साफ करत असल्याचे पथक व पंचांच्या उपस्थितीत स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी पंचनामा करून तौफिक बागवान याला ताब्यात घेतले. या प्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण करणार्या या कृत्याबद्दल नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.