शेअर मार्केटच्या नावाखाली तरुणाला ७ लाखांचा गंडा
दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
अहिल्यानगर -शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर दरमहा पाच टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून भिंगार परिसरातील एका तरुणाची तब्बल ७ लाख १० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात प्रशांत गवळी, ज्योती गवळी, प्रकाश मांगपे यांच्यासह पुणे व अहिल्यानगर शहरातील दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जून २०२४ ते जून २०२५ या कालावधीत संशयित आरोपींनी संगनमत करून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा निश्चित परतावा देण्याचे आमिष दाखवले. आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून रोख रक्कम, ऑनलाइन व्यवहार तसेच आरटीजीएसद्वारे लाखो रुपये स्वीकारले. मात्र, गुंतवणुकीची मुदत संपल्यानंतरही ना परतावा देण्यात आला, ना मुद्दल रक्कम परत करण्यात आली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित तरुणाने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मुलगीर करत आहेत. दरम्यान, नागरिकांनी शेअर मार्केटमधील अवास्तव परताव्याच्या आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
नायलॉन मांजाची विक्री; महिलेवर गुन्हा दाखल
भिंगार कॅम्प येथील आलमगीर परिसरात मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर शासनाने बंदी घातलेल्या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या एका महिलेविरोधात भिंगार कॅम्प पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. इदगाह मैदानाजवळ या मांजाची विक्री आणि वापर होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. मंगळवार दि. २३ रोजी दुपारी पोलिसांनी छापा टाकला. दरम्यान ५५ वर्षीय महिलेच्या ताब्यातून शासनाने प्रतिबंधित केलेला नायलॉन मांजा जप्त केला. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगिर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने ही कारवाई पूर्ण केली आहे. या मांजाचा वापर पक्ष्यांसह मानवजीवनासाठी धोकादायक ठरतो तसेच पर्यावरणालाही हानी पोहोचते. नागरिकांनी अशा घातक मांजाचा वापर करू नये, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार म्हस्के करत आहेत.


