Monday, November 3, 2025

अहिल्यानगर जिल्ह्यात कंपनीने तब्बल 450 कोटी रूपयांची फसवणूक,गुन्हा दाखल

अहिल्यानगर- शेअर बाजारात गुंतवणूक करून दरमहा 10-15 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवत ‘ट्रेडझ ईन्वेस्टमेंट प्रा. लि.’ या कंपनीने तब्बल 450 कोटी रूपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आदेशाने सुपा पोलीस ठाण्यात शुक्रवारी (1 ऑगस्ट) नवनाथ अवताडे याच्यासह आठ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी विनोद बबन गाडीलकर (वय 44 रा. वाघुंडे, माळवाडी, ता. पारनेर) यांनी फिर्याद दिली आहे. दरम्यान, नवनाथ अवताडे व त्याच्या साथीदारांनी सुरू केलेल्या इन्फिनेट, सिस्पे या कंपन्यातील फसवणूक प्रकरणी श्रीगोंदा व तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. आता ‘ट्रेडझ ईन्वेस्टमेंट प्रा. लि.’ या कंपनीत फिर्यादी व इतर 21 हजार 361 गुंतवणूकदारांनी सुमारे 450 कोटी रूपयांची गुंतवणूक केल्याचे समोर आले आहे. सीईओ अगस्त मिश्रा, संचालक राहुल काळोखे, गौरव सुखदेवे, प्रसाद कुलकर्णी, सचिन खडतरे, चेतन धर, ययाती मिश्रा व नवनाथ जगन्नाथ अवताडे (सर्व रा. पुणे) यांच्याविरूध्द हा गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी व इतर गुंतवणूकदारांना 10-15 टक्के परतावा मिळतो, असे भासवले गेले. त्यासाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये सेमिनार्स आयोजित केले गेले. त्या सेमिनार्समध्ये आकर्षक प्रेझेंटेशन्स, सेबी परवाने, बँक खात्यांचे दाखले यांचा वापर करून विश्‍वास निर्माण केला गेला. इतर गुंतवणूकदार जोडल्यास 50 टक्के नफा देण्याचे वचन फिर्यादीला देण्यात आले होते. फिर्यादी यांनी स्वत: पाच लाख 10 हजार रूपयांची गुंतवणूक केली. त्यांना सुरूवातीच्या काळात परतावा देण्यात आला. फिर्यादी व त्यांच्या ओळखीतील गुंतवणूकदार यांनी केलेल्या गुंतवणूकीवर तसेच जोडलेल्या मित्रपरिवाराच्या गुंतवणूकीवर संशयित आरोपींनी ऑक्टोबर 2024 पर्यंत दरमहा 10 ते 11 टक्के परतावा दिला.

मात्र नोव्हेंबर 2024 पासून परतावा कमी करत तो मे 2025 पर्यंत 1.8 टक्के इतकाच करण्यात आला. मार्च 2025 पर्यंत खातेमधून आलेला परतावा गुंतवणूकदारांना काढता येत होता, परंतू 1 एप्रिल 2025 पासून कोणत्याही गुंतवणूकदारांना विश्‍वासात न घेता, त्यांची कुठलीही परवानगी न घेता सर्व गुंतवणूकदार यांचे खाते परस्पर ‘आयएफ’ ग्लोबल ट्रेडींग लिमिटेड या पोर्टलवर स्थलांतरीत केले गेले. तसेच फिर्यादी व इतर गुंतवणूकदार यांची गुंतवणूक केलेली रक्कम ‘यूएसडीटी’ मध्ये शिफ्ट करून फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

नवनाथ अवताडे याने नवनवीन कंपन्या सुरू करून लोकांना गंडा घातला आहे. यापूर्वी श्रीगोंदा व तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. आता सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अवताडे व त्याच्या साथीदारांनी इन्फिनेट, सिस्पे या कंपन्यांसह आता ‘ट्रेडझ ईन्वेस्टमेंट’ या कंपनीमधून लोकांची फसवणूक केली असल्याचे समोर आले आहे. अवताडे व त्याच्या पंटरने राज्यभरात आणखी वेगवेगळ्या नावांनी कंपन्या सुरू करून लोकांना गंडा घातला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles