Saturday, February 21, 2026

शेअर मार्केटच्या नावाखाली अहिल्यानगर शहरातील डॉक्टरला दीड कोटींचा गंडा

अहिल्यानगर-गुंतवणुकीच्या गुंतवणूक केल्यास शंभर टक्के परताव्याचा दावा करणाऱ्या विदेशी कंपनीने अहिल्यानगर शहरातील एका डॉक्टरला १ कोटी ६० लाख ४० हजार रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी केडगाव येथील रहिवासी असलेले ६४ वर्षीय डॉक्टर चंद्रवंदन देवतादिन मिश्रा यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. डॉक्टर मिश्रा यांना एका व्हॉट्सॲप क्रमांकावरून ‘गुंतवणूक क्लब’मध्ये सामील होण्यासाठी संदेश आला होता. त्यानंतर त्यांना एका बनावट उपयोजना (ॲप) द्वारे ट्रेडिंगमध्ये १० ते २० टक्के नफा मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवण्यात आले. संबंधित टोळीने सुरुवातीला खोटा नफा दाखवून डॉक्टरचा विश्वास संपादन केला. त्यानंतर नोव्हेंबर ते डिसेंबर दरम्यान त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यांत मोठी रक्कम भरण्यास भाग पाडले.​ जेव्हा डॉक्टरांनी आपल्या नफ्याची आणि मूळ रकमेची मागणी केली, तेव्हा त्यांना कोणतीही रक्कम परत न देता त्यांची फसवणूक करण्यात आली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी व्हॉट्सॲप ग्रुपचा चालक आणि संबंधित बँक खातेधारकांविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस निरीक्षक सागर ढिकले पुढील तपास करत आहेत. नागरिकांनी अनोळखी गुंतवणूक योजनांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

कोठला परिसरात तरुणावर कुऱ्हाडीने सपासप वार
शहरातील कोठला रोड परिसरात जुन्या वादातुन तरुणावर कुऱ्हाडीने सपासप वार केल्याची घटना घडली. याप्रकरणी फिरोज रशिद शेख (रा. कोठला, जि. ता. अहिल्यानगर) यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी इस्त्रार शेख, अली मोसिन शेख, नवेद शेख, नोमान शेख, सुलतान शेख आणि हुसेन इम्रान शेख सर्व (रा. कोठला, जि. ता. अहिल्यानगर) यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. फिर्यादी फिरोज शेख फिटर आहे. त्यांचे कोठला रोडवर गॅरेज आहे तेथे काम करत असताना आरोपींनी जुन्या वादातुन मारहाण केली. ‘तुला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी देत इस्त्रार ऊर्फ टकलु मुक्तार शेख याने कुऱ्हाडीने वार केला. फिर्यादीचा भाऊ वसिम यालाही लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी सातजणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार गंगावणे करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles