मी आरटीआय कार्यकर्ता आहे, तुम्हाला जेलमध्ये बसविल, अशी धमकी देऊन प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका डॉक्टरला ब्लॅकमेल करत त्यांच्याकडून पैसे उकळल्याची घटना घडली. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.डॉ.रामदास बोरुडे (वय 40, रा.तांबडे किचन जवळ, वार्ड नं. 07, बेलापूर रोड, श्रीरामपूर) हे तालुक्यातील टाकळीभान येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात असताना एजाज पठाण (वय 27), रा.बोरावके कॉलेजच्या पाठीमागे, वॉर्ड नंबर 01 याने त्यांच्या विरोधात तक्रार अर्ज करणे, आरटीआय कार्यकर्ता असून छावा ब्रिगेड संघटनेचा जिल्हा संपर्कप्रमुख आहे, असे सांगून तसेच तुझ्या विरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करतो, रिट पिटीशन दाखल करतो, तुला जेलमध्ये बसवतो अशा स्वरूपाच्या वेगवेगळ्या धमक्या देऊन डॉ. बोरुडे यांना प्रथम 30 हजार रुपयांची मागणी केली, तसेच त्यापैकी 22 हजार रुपये गुगल-पे ने स्वीकारले. त्यानंतर पुन्हा आरोपीची लालच वाढली आणि त्याने एक ते दोन लाख रुपयांची खंडणीची मागणी करून डॉ.बोरुडे यांना वारंवार धमकावले.
याप्रकरणी आरोपी एजाज पठाण याच्या विरोधात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक श्री. धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. डौले हे पुढील तपास करत आहेत.


