Wednesday, November 5, 2025

सोलर पॅनल बसवण्याच्या नावाखाली नगर तालुक्यातील शेतकऱ्याची पावणेतीन लाखांची फसवणूक

अहिल्यानगर-‘प्रधानमंत्री सूर्य घर योजने’अंतर्गत सोलर पॅनल व सोलर पंप बसवून देण्याचे आमिष दाखवून, एका भामट्याने खातगाव टाकळी परिसरातील शेतकऱ्यांना तब्बल २ लाख ६७ हजार २०० रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी माजी सैनिक विजय भानुदास जपे (वय ५२, रा. खातगाव टाकळी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात राजेंद्र माधव बोऱ्हाडे (रा. आळेफाटा, जि. पुणे) याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजय जपे यांना घरावर सोलर प्लँट बसवायचा होता. त्यांनी आरोपी राजेंद्र बोऱ्हाडे याच्याशी संपर्क केला. बोऱ्हाडे याने आपण ‘APN सोलर कंपनी’चा अधिकृत सब-डिलर असल्याचे भासवून त्यांचा विश्वास संपादन केला.

​फिर्यादी जपे यांनी २४ जानेवारी २०२५ रोजी बोऱ्हाडे याला १०,००० रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले. तसेच, इतर शेतकरी संदीप कुलट, नामदेव कळमकर, नारायण कुलट व किसन सातपुते यांनीही रोख स्वरूपात पैसे जमा केले. अशाप्रकारे आरोपीने एकूण २,६७,२०० रुपये गोळा केले.
​पैसे देऊन महिना उलटला तरी सोलर पॅनल किंवा पंप बसवले नाहीत. आरोपी बोऱ्हाडे याला फोन केल्यास तो ‘पुढील आठवड्यात बसवणार आहे’ असे सांगून वेळ मारून नेत होता. दरम्यान, याच आरोपीने राहुरी परिसरातही अशाच प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची व त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती फिर्यादी व इतर शेतकऱ्यांना मिळाली.

​आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विजय जपे यांनी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. आरोपीने विश्वासघात करून पळ काढल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी सपोनि चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ सांगळे पुढील तपास करत आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles