गुलमोहर रोड येथील मार्कंडेय परिसरात नगरसेवक योगिराज गाडे यांच्या स्वखर्चातून भव्य स्वच्छता मोहीम
अहिल्यानगर शहरातील मार्कंडेय सोसायटी, नवले नगर, रामकृष्ण कॉलनी, गुलमोहर पार्क, हरी ओम नगर व सावली सोसायटी या परिसरातील मोकळ्या जागेची स्वच्छता नगरसेवक योगिराज गाडे यांनी आपल्या स्वखर्चातून करून दिली आहे.
मागील काही वर्षांपासून अहिल्यानगर महानगरपालिका निधीअभावी (आर्थिक टंचाईमुळे) अशा प्रकारची मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबवू शकली नव्हती. मनुष्यबळ व यंत्रसामग्रीअभावी हा परिसर कचरा, सांडपाणी, नाला, झुडपे व काटेरी झाडांनी पूर्णपणे भरून गेला होता. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाला होता तसेच परिसर अस्वच्छ आणि असुरक्षित बनला होता.
निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनाप्रमाणे नगरसेवक योगिराज गाडे यांनी कोणत्याही शासकीय निधीची प्रतीक्षा न करता स्वतःच्या खर्चातून पथक, जेसीबी व आवश्यक यंत्रसामग्रीची व्यवस्था करून संपूर्ण परिसर स्वच्छ करून घेतला. नाले साफ करण्यात आले, कचरा हटविण्यात आला तसेच झुडपे व काटेरी झाडे पूर्णपणे काढण्यात आली. आज हा परिसर स्वच्छ, सुरक्षित व नागरिकांच्या वापरासाठी खुला झाला आहे.
ही मोहीम केवळ स्वच्छतेपुरती मर्यादित नसून “जनतेच्या आरोग्याचा प्रश्न हा माझ्यासाठी सर्वात मोठी जबाबदारी आहे” या भूमिकेतून उचललेले पाऊल आहे. महानगरपालिकेवर आर्थिक ताण असताना नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी स्वतः पुढाकार घेऊन काम करणे हीच लोकप्रतिनिधीची खरी बांधिलकी असल्याचे नगरसेवक योगिराज गाडे यांनी स्पष्ट केले.
या स्वच्छता मोहिमेच्या वेळी अॅड. धोंडीराम घोरपडे, प्रा. बालकृष्ण सिद्दाम, प्रभाकर खंकार, भास्करराव जरहाड, राजेंद्र सिद्दाम, महेश धर्माधिकारी, केशव धर्माधिकारी, प्रा. सुधीर हरिश्चंद्रे, अशोक गायकें, अॅड. गरजे, राकेश धोकारिया, महेश तानपुरे, अनंत कडेकर, प्रथमेश महिंदरकर तसेच परिसरातील इतर नागरिक उपस्थित होते.
परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत नगरसेवक योगिराज गाडे यांचे मनःपूर्वक आभार मानले असून, पुढील काळातही अशाच लोकहिताच्या उपक्रमांची अपेक्षा व्यक्त केली आहे


