Sunday, November 2, 2025

अहिल्यानगरमध्ये फायटर जेटमधून पडला जिवंत बॉम्ब; तब्बल एक महिन्यांनी सैन्यानं केला निकामी

राहुरी : तालुक्यातील वरवंडी येथे दि. २४ मार्च रोजी दुपारच्या सुमारास एका फायटर जेट विमानातून एक जिवंत बॉम्ब पडला होता. एक महिन्या नंतर काल दि. ३० एप्रिल रोजी पुणे येथील भारतीय सैन्य दलाच्या बीडीएस (बॉम्ब डिस्पोज स्कॉड) पथकाने घटनास्थळी येऊन त्या बॉम्बचा फ्युज काढून तो निकामी केला. सदर बाॅम्ब आज घटना स्थळावरून केके रेंज येथे नेऊन बॉम्बचा विस्फोट केला जाणार असल्याची माहिती सैन्य दलातील अधिकाऱ्यांनी दिली.

दि. २४ एप्रिल २०२५ रोजी दुपारच्या सुमारास राहुरी तालुक्यातील वरवंडी परिसरातील बांबू प्रकल्पात आकाशातून जाणाऱ्या एका जेट विमानातून एक जिवंत बॉम्ब पडला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हादरा बसला होता. सदर बॉम्ब पडल्यापासुन वरवंडी परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. तब्बल एक महिना होऊन त्या बेवारस बॉम्बची दखल घेतली नाही. परिसरातील नागरीकांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन वारंवार पाठपुरावा केला. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी दिल्ली येथे संरक्षण विभागाला ही माहीती कळविली होती.

काल सकाळी पुणे येथील भारतीय थल सेनेचे नायक सुभेदार प्रकाश कोटगी, हवालदार प्रमोद हनमंताचे, हवालदार टी. कन्नन, हवालदार बी. एन. राव हे बॉम्ब निकामी करणारे पथक घटनास्थळी दाखल झाले. पथकाने जेसीबीच्या सहाय्याने सात फूट खड्ड्यातील जिवंत बॉम्ब बाहेर काढला. त्यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रभारी सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांनी सहकार्य केले. त्यानंतर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. नायक सुभेदार कोटगी यांनी केके रेंजच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. घटनास्थळी बॉम्ब पाहण्यासाठी गर्दी होऊ नये, यासाठी पोलीस व कृषी विद्यापीठाचे सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

बॉम्ब निकामी करणाऱ्या पथकाने बॉम्बचे मोजमाप केले. सदर बाॅम्ब साडेचार फूट लांब, चार फूट व्यास, ४५३ किलो वजनाचा आहे. बॉम्बची पिन निघाली नाही, त्यामुळे बॉम्ब फुटला नाही. अन्यथा एक किलोमीटर परिघातील क्षेत्र उध्वस्त झाले असते. तीन ते चार किलोमीटर पर्यंत भूकंप सदृश हादरे बसले असते. मोठी जीवित व वित्तहानी झाली असती. अशी माहिती सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles