अहिल्या नगरच्या युवा तलवारबाजांचे छत्रपती संभाजीनगर येथे शानदार प्रदर्शन; राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार!
छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक २७ ते २९ दरम्यान पार पडलेल्या १० वर्षांखालील आणि १२ वर्षांखालील राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत अहिल्या नगर जिल्ह्याच्या खेळाडूंनी लक्षवेधी कामगिरी करत सांघिक पातळीवर तृतीय क्रमांक पटकावला. युवा खेळाडूंच्या या यशाने जिल्ह्याचे नाव उंचावले आहे.
या स्पर्धेत अहिल्यानगर तलवारबाजी संघटना च्या संघाने १० वर्षांखालील मुलींच्या ‘इपी’ गटात वसुधा साठेने तृतीय क्रमांक पटकावला. तसेच, १० वर्षांखालील मुलींच्या ‘फॉईल’ गटात काव्या धनगेकर हिने द्वितीय, तर निधी देशमुख हिने तृतीय क्रमांक मिळवून जिल्ह्याची मान वाढवली. १० वर्षांखालील मुलांच्या ‘इपी’ गटात अक्षद दौंडने तृतीय क्रमांक मिळवला.
१२ वर्षांखालील गटातही अहिल्या नगरच्या खेळाडूंनी आपला दबदबा कायम राखला. १२ वर्षांखालील मुलींच्या ‘सेबर’ गटात रिद्धी महाडिकने तृतीय क्रमांक पटकावला, तर १२ वर्षांखालील मुलांच्या ‘सेबर’ गटात प्रज्वल सत्रेने प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
या सर्व विजयी खेळाडूंची नाशिक येथे होणाऱ्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. यामुळे त्यांना राष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे.
या खेळाडूंसोबतच प्रांजल बडगु, गौरी झिरपे आणि आर्यन सत्रे यांनीही स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली. या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक सुनील गोडळकर, ओंकार सुरग आणि वैष्णवी गोडळकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
खेळाडूंच्या या यशाबद्दल त्यांचा सत्कार अहिल्यानगर जिल्हा तलवारबाजी संघटना व अहिल्यानगर ओलंपिक असोसिएशन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यावतीने जिल्हा क्रीडा अधिकारी श्री ज्ञानेश्वर खुरांगे सर यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी श्री शैलेश गवळी, श्री विशाल गरजे, श्री प्रवीण कोंडावळे, श्री राम गोडळकर, श्री केदार देशमुख, सौ. महाडिक मॅडम, सौ. धनगेकर मॅडम, सौ. देशमुख मॅडम आणि ॲडव्होकेट वेदिका गोडळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
अहिल्या नगरच्या या युवा तलवारबाजांच्या चमकदार कामगिरीमुळे जिल्ह्यात खेळाला प्रोत्साहन मिळेल अशी आशा आहे. राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या सर्व खेळाडूंना पुढील वाटचालीस शुभेच्छा
अहिल्या नगरच्या युवा तलवारबाजांचे छत्रपती संभाजीनगर येथे शानदार प्रदर्शन
- Advertisement -


