राहुरी तालुक्यातील टाकळीमिया परिसरात वाळू उपसा करण्यास विरोध केल्याच्या कारणावरून एका तरुणावर 12 ते 13 जणांच्या टोळीने पिस्तूलचा धाक दाखवत लोखंडी रॉड व गजाने बेदम मारहाण केल्याची घटना दि. 26 मार्च रोजी दुपारच्या सुमारास घडली. याबाबत वैभव उत्तम खाडे (वय 31, रा. लाख, ता. राहुरी) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले की, 26 मार्च रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ते घरी असताना संदीप आढाव याने त्यांना टाकळीमिया येथे येण्यासाठी फोन केला.
त्यानुसार वैभव खाडे हे दुचाकीवरून लाख येथून टाकळीमिया येथे जात असताना गल्हे यांच्या जनावरांच्या शेडजवळ 10 ते 12 जण थांबलेले होते. यावेळी आरोपी ऋषीकेश आढाव याने पिस्तूल दाखवून त्यांना थांबवले. त्यानंतर उपस्थित आरोपींनी लोखंडी रॉड, लोखंडी गज तसेच लाथाबुक्क्यांनी वैभव खाडे यांना बेदम मारहाण केली. तसेच त्यांचा मोबाईल फोन फोडून दुचाकीचेही नुकसान करण्यात आले. तू आम्हाला वाळू उपसा करण्यास विरोध करतोस, म्हणून आम्ही तुला मारहाण केली, असे सांगत आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या मारहाणीत वैभव खाडे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी ऋषीकेश आढाव, संदीप आढाव (दोघे रा. वळण), राहुल मोरे, सचिन मोरे, राजेंद्र आढाव (तिघे रा. लाख) तसेच इतर 7 ते 8 अनोळखी इसम अशा एकूण 12 ते 13 जणांविरुद्ध गुन्हा रजि. क्र. 297/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 118 (2), 115 (2), 352, 351 (2), 324 (4), 189 (2), 190, 191 (1) व 191 (3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राहुरी पोलीस करत आहे.


