सासरी नांदत असताना होत असलेला शारीरिक व मानसिक छळ असह्य झाल्याने विवाहित तरुणीने आत्महत्येचा पर्याय निवडत आपले जीवन संपविल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (दि. 26) नगर तालुक्यातील देहरे येथे घडली आहे.
देहरे येथील पूनम विशाल लांडगे (वय 28) या विवाहितेने शनिवारी सकाळी 10च्या सुमारास राहत्या घरी विषारी औषध प्राशन करत आत्महत्या केली आहे. पूनम हिचा विवाह 3 वर्षांपूर्वी देहरे येथील विशाल रावसाहेब लांडगे या लष्करी जवानासोबत झाला होता. तिला एक दीड वर्षाची लहान मुलगी आहे. तिच्या आत्महत्येनंतर तिचे वडील गोविंद गंगाधर पठारे (वय 53, रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या फिर्यादीवरून मृत पूनम हिचा नवरा विशाल रावसाहेब लांडगे, सासू सुंदरबाई रावसाहेब लांडगे, मामे सासरा जालिंदर सयाजी करांडे, मामे सासू रोहिणी जालिंदर करांडे (सर्व रा. देहरे, ता. नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत पूनम हिस बंगल्याच्या कामासाठी माहेराहून 3 लाख रुपये आणावेत या कारणासाठी तिला उपाशी पोटी ठेवून तिचा छळ करण्यात आला.


