नगर मनमाड राज्य महामार्गावर काल (दि. ११ सप्टेंबर) रोजी सायंकाळच्या दरम्यान राहुरी फॅक्टरी परिसरात पुन्हा एक अपघात होऊन एका ३२ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. गेल्या पंधरा दिवसात राज्य महामार्गावर अपघातात एकूण ६ जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड संतापाची लाट पसरत आहे.काल (दि. ११ सप्टेंबर) सायंकाळी ५.१५ वाजे दरम्यान एक कंटेनर राहुरीकडून कोल्हारकडे जात होता. त्यावेळी नितीन बापूसाहेब ढोकणे (वय ३२ वर्षे, रा. अंबिका नगर, राहुरी फॅक्टरी, ता. राहुरी) हा तरुण राहुरी फॅक्टरीकडे त्याच्या मोटारसायकलवर जात असताना अपघातात होऊन कंटेनरचे चाक नितीन ढोकणे याच्या डोक्यावरून गेल्याने तो जागीच ठार झाला.
कंटेनर चालक हा कंटेनर सोडून पसार झाला. यावेळी पप्पू कांबळे यांनी ताबडतोब घटनास्थळी हजर राहुन मयत नितीन ढोकणे याला त्यांच्या रुग्णवाहिकेतून राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. त्या ठिकाणी नितीन ढोकणे याचे मित्र व नातेवाईकांनी गर्दी केली होती.
गेल्या पंधरा दिवसात नगर मनमाड महामार्गावर रस्ता अपघातात सहा जणांचा बळी गेला. काल दुपारी राहुरी फॅक्टरी येथे तालूक्यातील नागरीकांनी रस्त्याच्या प्रश्नाबाबत चक्काजाम आंदोलन केले होते. त्याचवेळी जिल्हाधिकारी हे महामार्गावरून जात असताना काही आंदोलनकर्त्यांनी त्यांची गाडी अडवली. मात्र जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या भावना समजून न घेता उलट आंदोलन कर्त्यांवरच गुन्हे दाखल करण्याचे सांगितले. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
या घटनेतील मयत नितीन बापूसाहेब ढोकणे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी व दोन मुली असा परिवार असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर नगर मनमाड महामार्ग आणखीन किती बळी घेणार? प्रशासनाला कधी जाग येणार? असा प्रश्न नागरिकांमधून केला जात आहे.


