शेवगाव-बारावीचा पेपर देऊन मावस बहिणीला सुरक्षित घरी पोहोचवण्याच्या जबाबदारीने निघालेल्या तरुणावर नियतीने क्रूर प्रहार केला. दुचाकीवरून बहिणीला घरी नेत असताना झालेल्या भीषण अपघातात समर्थ सोमनाथ लोखंडे (वय 21, रा. एरंडगाव समसुद, ता. शेवगाव) याचा जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने एरंडगावसह संपूर्ण शेवगाव तालुका शोकसागरात बुडाला आहे. मंगळवारी (दि. 10) सकाळी बारावीच्या इंग्रजी विषयाचा पेपर असल्याने समर्थने मावस बहिण समृद्धी शिंदे व तिची मैत्रीण दिप्ती धस यांना दुचाकीवरून आबासाहेब काकडे विद्यालयात सोडून तो परत गेला. दुपारी पेपर संपल्यानंतर बहिणीला घेण्यासाठी तो पुन्हा विद्यालयात आला.
दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास तिघेही गावाकडे परतत असताना एरंडगाव भागवत परिसरात त्यांच्या दुचाकीची पुढे चाललेल्या ट्रॅक्टरला मागून जोरदार धडक बसली. अपघात इतका भीषण होता की समर्थचा जागीच मृत्यू झाला. बहिण समृद्धी शिंदे व तिची मैत्रीण दिप्ती धस या दोघी किरकोळ जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले समर्थ हा इंजिनिअरिंगच्या दुसर्या वर्षात शिक्षण घेत होता. कुटुंबाचा आधार असलेला मुलगा अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने लोखंडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. समर्थच्या पश्चात आई-वडील पत्रकार सोमनाथ लोखंडे व एक भाऊ असा परिवार आहे. गावी अत्यंत शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त होत.


