अहिल्यानगर-सोशल मीडियावरील ओळखीतून मैत्री आणि नंतर लग्नाचे आमिष दाखवून एका २१ वर्षीय तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात जहिद फारुख तांबोळी (रा. केडगाव, अहिल्यानगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा जिल्ह्यातील रहिवासी असलेली २१ वर्षीय पीडिता पुण्यात खाजगी नोकरी करते. सुमारे चार वर्षांपूर्वी तिची इंस्टाग्रामवरून आरोपी जहिद तांबोळी याच्याशी ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि दोघेही मोबाईलद्वारे एकमेकांच्या संपर्कात होते. आरोपी जहिदने पीडितेला लग्नाचे वचन देऊन तिचा विश्वास संपादन केला. १६ सप्टेंबर रोजी त्याने तिला भेटण्यासाठी अहिल्यानगरला बोलावले.
त्यानंतर केडगाव येथील एका पान शॉपमध्ये आणि नंतर आरणगाव रोडवरील लॉजमध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पीडितेने लग्नाविषयी विचारणा केली असता, आरोपीने तिला शिवीगाळ व दमदाटी करून पुण्यात निघून जाण्यास सांगितले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित तरुणीने थेट कोतवाली पोलीस स्टेशन गाठून आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


