मुंबई : राज्यातील अनेक खात्यातील भ्रष्टाचार गेल्या काही महिन्यांत समोर येत असून सर्वसामान्य नागरिकांकडून पैसे घेतल्याशिवाय कामच होत नाही, अशी भावना प्रत्येकाची आहे. काही दिवसांपूर्वी चक्क मंत्रालयातच अन्न व औषध विभागाच्या कार्यालयातील लिपिकास लाच घेतल्याप्रकरणी रंगेहात अटक करण्यात आली होती. याप्रकरणी, अधिक तपास सुरू असून संबंधित लिपिक अटकेत आहे. त्यातच, आता मुंबईच्या मालाड परिसरात कुरार पोलीस स्टेशनमध्ये एसीबीनं मोठी कारवाई केली. कुरार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव तावडेसह एका पीएसआयला लाच घेताना अँटी करप्शनने रंगेहात अटक केली आहे. याप्रकरणी, आरोपींना 23 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
फिर्यादी वकीलाचा गुन्हा नोंद करण्यासाठी पीएसआय आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक तावडे यांनी 3 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यामध्ये गुन्हा दाखल करताना पोलीस अधिकाऱ्याने दोन लाख रुपयांची लाच घेतली होती. मात्र, उर्वरित एक लाखाची रक्कम आज घेताना एसीबीच्या टीमने दोन्ही पोलिसांना रंगेहात अटक केली. विशेष म्हणजे या पोलिसांच्या कॅबिनमध्ये लाखोंची रोकडही आढळून आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात कारवाईत अटक करण्यात आलेल्या कुरार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव तावडे आणि पोलीस उप-निरीक्षक ज्ञानेश्वर जुन्ने यांना 23 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील तक्रारदाराविरोधातील फसवणूक आणि लैंगिक शोषणाच्या तक्रारीवर गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलिसांनी तीन लाखांची लाच मागितली होती. बुधवारी करण्यात आलेल्या सापळा कारवाईत 1 लाखांची स्वीकारल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली.
याप्रकरणातील आरोपी संजीव तावडे हे कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तर ज्ञानेश्वर जुन्ने पोलीस उप-निरीक्षक असून त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे केल्याची दाट शक्यता व्यक्त करत सखोल तपास करण्यासाठी 5 दिवसांच्या पोलीस कोठडीची एसीबीची मागणी होती. न्यायालयाने ती मागणी मान्य करत 23 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, अटकेवेळी पोलीस अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये 6 लाख 34 हजार रुपये रोख रक्कम आढळून आली आहे. लाच घेताना रंगेहाथ अटक केल्यानंतर केबिनमध्ये झाडाझडती घेण्यात आली होती. या झाडाझडती दरम्यान 6 लाख 34 हजारांची रोख रक्कम एसीबीला सापडली आहे.


