बीडमध्ये लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली. शेतकऱ्याकडून लाच घेताना तहसीलदाराला एसीबीने रंगेहाथ पकडलं. बीडच्या परळीतील तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्याविरोधात लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने मोठी कारवाई केली. काही वेळापूर्वी त्यांना लाच घेताना ताब्यात घेण्यात आले. एसीबीच्या या कारवाईमुळे बीडमध्ये खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, परळी येथील वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांना लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले. शेतकऱ्याकडून ५० हजारांची लाच घेताना त्यांना एसीबीने पकडले. तक्रारदाराकडून सोलंसी (ऐपतीचे) प्रमाणपत्र देण्यासाठी २० हजार रुपयांची तहसीलदारांकडून मागणी करण्यात आल्याची तक्रार बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. या तक्रारीनंतर लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचून ही कारवाई केली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदारांना लाच घेताना पकडण्यात आले. तक्रारदाराकडून सुरुवातीला ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र तडजोडीनंतर २० हजार रुपयांवर सौदा ठरल्याची माहिती समोर आली आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल झाल्यानंतर पथकाने पडताळणी करून सापळा रचला. दरम्यान तक्रारदाराच्या हालचालींवर संशय आल्यानंतर तहसीलदार मुंडे यांनी पैसे स्वीकारण्यास टाळाटाळ केल्याचे सांगण्यात येत आहे.
तरीही एसीबीने आवश्यक पुरावे संकलित करत पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. या घटनेमुळे परळी तालुक्यातील महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली असून जिल्ह्यातही या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे. संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास बीड एसीबीकडून केला जात आहे. भ्रष्टाचाराविरोधातील या कारवाईमुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात असून प्रशासनातील पारदर्शकतेसाठी अशा कठोर कारवाया आवश्यक असल्याची भावना व्यक्त होत आहे.


