अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टीने तसेच मंजुरी मिळालेल्या कामांना तातडीने सुरुवात करावी. या कामांमध्ये काही अडचणी असल्यास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यामध्ये मार्ग काढा; मात्र छोट्या कामांसाठी कामे थांबवू नका. निर्धारित वेळेत कामे पूर्ण होण्यासाठी अधिक यंत्रणा वापरा, अशी सूचना जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.जिल्ह्यात सध्या अहिल्यानगर-मनमाड, सुरत-चेन्नई, पुणे-अहिल्यानगर, संभाजीनगर, नांदुर शिंगोटे ते कोल्हार या मार्गांना केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. यापैकी काही मार्गांची कामे सध्या सुरू आहेत. इतर मार्गांची कामे सुरू होण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून करण्यात येत आहेत. या सर्व कामांचा आढावा घेण्यासाठी मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत सर्व प्रकल्पांच्या कामांचा आढावा घेण्यात आला.या बैठकीस प्रकल्प संचालक धनेश स्वामी, प्रकल्प सल्लागार ओम सिंग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक विवेक माळवंदे, कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपकार्यकारी अभियंता अभिमन्यु जमाले, उपअभियंता काशिनाथ गुंजाळ यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. अहिल्यानगर-मनमाड कामाचा वेग अधिक वाढविण्याची गरज आहे. यासाठी अधिक यंत्रणा कार्यरत करा. मागच्या कंत्राटदाराने चुकीच्या पद्धतीने गटारीची कामे केली. त्यामुळे या मार्गाचे अधिक नुकसान झाले. ही परिस्थिती पुन्हा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्या. अहिल्यनगर-मनमाड मार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी पुढील काही दिवस या मार्गावरील जड वाहतूक अन्य मार्गाने वळविण्याबाबत मंत्री विखे पाटील यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांना दुरध्वनीवरून सूचना दिल्या.
वाहतूक वळविण्यात येणार्या मार्गावर पावसाने पडलेले खड्डे तातडीने बुजवून हा मार्ग वाहतुकीसाठी प्राधान्याने सुरळीत करून द्यावा. त्यानुसार कोपगावकडून अहिल्यानगरकडे येणारी आणि जाणारी जड वाहने अन्य मार्गाने वळविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. याबाबतचे प्रकटन तातडीने जाहीर करण्याच्या सूचना त्यांनी महामार्ग पथक आणि पोलिस प्रशासनाला दिल्या.
नांदुरशिंगोटे ते कोल्हार या मार्गाचे काम सुरू झाले असून साईडपट्ट्या आणि भूसंपादनाचे काम प्रगतीपथावर आहे. सावळीविहीर ते कोपरगाव या मार्गावरील उड्डाणपुलांची कामे पूर्णत्वास गेली असून अन्य कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी अधिकार्यांना दिल्या. जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांबाबत कोणत्याही अडचणी असतील तर त्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन यामध्ये मार्ग काढू. मात्र छोट्या कारणांमुळे कोणतेही काम थांबवू नका. यंत्रणेला काही त्रास होत असेल तर याबाबतही वेळोवेळी संपर्क साधा. राज्य सरकारच्या स्तरावर काही कामे प्रलंबित असतील तर याबाबतही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करू, असे मंत्री विखे पाटील यांनी बैठकीदरम्यान सांगितले.