अहिल्यानगर-जिल्ह्यात गायवर्गीय जनावरांमध्ये लम्पी आजाराचा फैलाव मोठ्या प्रमाणावर आढळू लागला आहे. जिल्ह्यात पूशसंवर्धन विभागाने 92 टक्के जनावरांचे लसीकरण केल्यानंतरही खराब हवामानामुळे जनावरांमध्ये लम्पी आजाराची व्याप्ती वाढतांना दिसत आहे. पशूसंवर्धन विभागाकडे नोंदणी झालेल्यामध्ये आतापर्यंत 20 जनावरांचा लम्पीमुळे मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षात हा आकडा पाच ते दहा पट अधिक असल्याची भिती व्यक्त होत आहे. दरम्यान, राहाता तालुक्यात सर्वाधिक लम्पीच्या केसेस असतांना त्याकडे दुर्लक्ष करत दांड्या मारणार्या महिला पशूधन पर्यवेक्षक दर्शना सातदिवे यांच्यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.
जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांतच 472 जनावरे लम्पी बाधित आढळली आहेत. यापैकी 20 जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. दरम्यान लसीकरणासाठी पशुसंवर्धन विभागाच्या यंत्रणेची धावपळ उडाली असून आधी लसीकरण केलेले असतांना लम्पीचा प्रभाव वाढल्यानंतर पशूसंवर्धन विभागाने पुन्हा जनावरांचे लसीकरण मोहिम हाती घेतले आहे. यासाठी आधी शेजारच्या धुळे जिल्ह्यातून काही प्रमाणात लस मागवण्यात आली आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या सेस फंडातूनही नव्याने लस विकत घेण्यात आली आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील लम्पी बाधीतांची संख्या 472 वर पोहोचली आहे. यापैकी 233 जनावरे लम्पीमुक्त झाली आहेत, तर 219 जनावरांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 6 अत्यवस्थ आहेत. गेल्या 15 दिवसात 20 दुभती जनावरे मृत्युमुखी पडली. यामध्ये एकट्या राहता तालुक्यातील दाढ येथील 13 जनावरांचा, नेवासा 3, संगमनेर 2, शेवगाव 1 व राहुरी 1 अशी एकूण 20 जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. केवळ नगर, पाथर्डी व श्रीरामपूर हे तीन तालुके वगळता जिल्ह्यातील इतर सर्व तालुक्यांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव आढळून आल्याची माहिती पशूसंवर्धन विभागाच्यावतीने देण्यात आली.
जिल्ह्यात गायवर्गीय 13 लाख 78 हजारांवर जनावरे आहेत. त्यांचे लसीकरण एप्रिलमध्ये सुरू करण्यात आले होते. मात्र असे असतानाही जनावरे लम्पी बाधित होऊ लागली आहेत. लसीचे डोस मिळूनही जनावरांना लसीकरण न केल्याने, लसीकरणात निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल राहाता तालुक्यातील पशुसंवर्धन पर्यवेक्षक दर्शना सातदिवे यांना निलंबित केल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी यांच्यावतीने देण्यात आली.


