आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे अॅक्शनवर मोडवर आलेत. राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. काही जण दिव्यांगांसाठीच्या योजनांचा लाभ बोगसगिरीने घेतल्याचं समोर आल्यानंतर आयएएस अधिकारी तुकाराम मुंढेंनी धडक कारवाई सुरू केली.
दिव्यांगांसाठीच्या योजनांचा लाभ बोगसगिरीने घेणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी राज्यातील बोगस दिव्यांगांची झाडाझडती घेतली जाणार असून त्याचे लेखी आदेश तुकाराम मुंढे यांनी दिलेत. राज्यातील सर्व ३४ जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिलेत. दरम्यान सचिवांकडून आदेश मिळताच मुख्याधिकाऱ्यांनी दिव्यांग प्रमाणपत्रांच्या पडताळणीला सुरुवात केलीय.
झेडपीच्या शिक्षण, आरोग्य, बांधकाम विभागासह सर्व विभागांतर्गत असलेले सर्व अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचा समावेश आहे. बोगस प्रमाणपत्राद्वारे लाभ घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले. इतकेच नाही तर तुकराम मुंढे यांच्या आदेशामुळे प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांचीही झोप उडालीय.
राज्यात बोगस दिव्यांगांचा आकडा वाढलाय. जिल्हा परिषदअंतर्गत कार्यरत असणाऱ्या दिव्यांग अधिकारी व कर्मचारी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेतात. विभागास याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींमध्ये दिव्यांगांच्या वैश्विक ओळखपत्राबाबत शंका व्यक्त केली. त्यामुळे राज्यातील सर्वच एकूण ३४ जिल्हा परिषदेतील दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचे निर्देश दिव्यांग कल्याण विभागाने दिलेत. सर्व ३४ जिल्हा परिषदांच्या सीओंकडून महिनाभरात पडताळणीचा अहवाल दिव्यांग कल्याण आयुक्तांकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेत.
प्रत्येक दिव्यांगजनाला सन्मानाने समाधानाने जगण्याचा अधिकार आहे. दिव्यांग नागरिकसुद्धा समृद्ध, समाधानकारक आणि सन्मानाने जगू शकतात. आपण त्यांच्याशी सन्मानाने व समानतेने वागणे आवश्यक आहे. त्यांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवता कामा नये. दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण करुण त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे ही न्यायाची मागणी असल्याचं तुकाराम मुंढे म्हणालेत. समावेशन, सन्मान आणि समान संधी यांवरच खऱ्या अर्थाने सक्षम समाजाची पायाभरणी होते. चला, आपण सर्व मिळून खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक समाजाचे ध्येय साध्य करण्यासाठी त्यांना सक्षम करूया, असं तुकाराम मुंढे यांनी सोशल मीडियावरील पोस्टमधून म्हटलंय.


