लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता अद्यापही पात्र महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. गेल्या महिन्यात शेवटच्या आठवड्यात हा हप्ता जमा झाला होता. त्यामुळे मे महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न पात्र महिलांकडून सातत्याने विचारला जातोय. त्यावर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी उत्तर दिलं आहे. त्या विधानभवनातील बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होत्या.
‘लाडकी बहीण’ योजनेत काही चुका झाल्याची कबुली राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. सरकारी कर्मचाऱ्यांसहित अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. निकषांच्या चौकटी मोडून या महिलांनी अर्ज केल्याने त्यांचे अर्ज आता बाद केले जात आहेत. निकषांनुसार आता पात्र महिलांच्या अर्जांची पुन्हा छाननी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे गरजू आणि आर्थिक दुर्लब घटकातील महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार असल्याचं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
गेल्यावर्षी जुलै महिन्यात ही योजना सुरू करण्यात आली. २०२४ ऑगस्ट महिन्यात दोन महिन्यांचे हप्ते मिळाले होते. त्यानंतर दर महिन्याला हे हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा होत होते. मात, या योजनेसाठी एक ठराविक तारीख ठरवण्यात आली नसल्याने पात्र महिला हप्त्याची आतुरतेने वाट पाहत असतात. दरम्यान, मे महिना उलटून आता जून महिला सुरू झाला तरीही मे महिन्याचे पैसे अद्यापही खात्यात जमा झालेले नाहीत. त्यामुळे हे पैसे खात्यात कधी जमा होणार असा प्रश्न महिला वर्गाकडून विचारला जात आहे. याबाबत आदिती तटकरे म्हणाल्या, “मे महिन्याचा हप्ता लवकरच पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाईल. लाडक्या बहिणींना आश्वासन देते की ही योजना बंद होणार नाही. सरकारी काम करणाऱ्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे जानेवारी महिन्यातच समजलं होतं. तेव्हाच पैसे थकवण्यात आले. लाडकी बहीण योजनेसंदर्भात गैरसमज पसरवले जात आहेत. महायुती सरकारच्या काळातील ही योजना आहे. त्यामुळे ही योजना बंद होणार नाही.”


