Saturday, February 21, 2026

अहिल्यानगर जिल्ह्यात ई-पीक पाहणीसाठी प्रशासन ‘मिशन मोड’वर ; अवघे काही दिवस उरले

अहिल्यानगर -रब्बी हंगामातील पिकांची ‘ई-पीक पाहणी’ नोंदविण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांनी तातडीने पिकांची नोंदणी करावी, यासाठी महसूल प्रशासन आता अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे. शेतकर्‍यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी व मार्गदर्शनासाठी वरिष्ठ अधिकारीच आता थेट शेतकर्‍यांच्या बांधावर पोहोचले आहेत.
शेतकरी स्तरावरून ई-पीक पाहणीसाठी 24 जानेवारी 2026 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. जे शेतकरी या मुदतीत आपल्या पिकांची ई- पीक पाहणी अ‍ॅपव्दारे नोंद करणार नाहीत, त्यांना पीक विमा, पीक कर्ज व नैसर्गिक आपत्तीच्या काळात मिळणारे सरकारी अनुदान मिळण्यास अडचणी येऊ शकतात.

तसेच, कोणत्याही शासकीय कृषी योजनांचा लाभ घेता येत नाही. सध्याची स्थिती पाहता शेतकर्‍यांचा प्रतिसाद वाढविण्यासाठी प्रशासन आता युध्दपातळीवर प्रयत्न करत आहे. नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम व जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या सूचनेनुसार महसूल विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष फील्डवर उतरले आहेत. शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे, पोहेगाव व देर्डे या गावांना भेटी दिल्या. विशेष म्हणजे देर्डे येथे अपर जिल्हाधिकारी कोळेकर यांनी केवळ पाहणीच केली नाही, तर शेतकर्‍यांच्या अडी-अडचणी समजून घेत चक्क स्वतःच्या मोबाईलवरून शेतकर्‍यासमक्ष त्यांच्या पिकाची ‘ई-पीक पाहणी’ नोंदणी करून दिली. अधिकार्‍यांच्या या तत्परतेमुळे शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे.

दुसरीकडे, अहिल्यानगरचे अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनीही अहिल्यानगर तालुक्यातील चास व पारनेर तालुक्यातील सुपा, महासने या गावांमध्ये जाऊन पिकांची पाहणी केली. शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील सर्व उपविभागीय महसूल अधिकारी व तहसीलदार बुधवारी प्रत्यक्ष बांधावर उपस्थित होते. अंतिम मुदतीला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत 24 जानेवारीपर्यंत आपली ई- पीक पाहणी पूर्ण करावी, जेणेकरून भविष्यातील शासकीय लाभांपासून शेतकरी वंचित राहणार नाहीत, असे कळकळीचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles