ऐन गणेशोत्सवादरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केलं होतं. या आंदोलनासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात मराठा समाज मुंबईत दाखल झाला होता. यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील आठ मागण्यांपैकी सहा मागण्या राज्य सरकारने मान्य करत त्यासंदर्भात शासन निर्णय (जीआर) जारी केला आहे. या निर्णयानंतर पाच दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेत समाधान व्यक्त केले होते. मात्र, सरकारच्या या जीआरला ओबीसी संघटनांकडून तीव्र विरोध केला जात आहे. विशेषतः मंत्री छगन भुजबळ यांनी या जीआरविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. आता मराठा समाजाच्या आंदोलनानंतर ओबीसी समाज देखील मुंबईत लवकरच महामोर्चा काढणार आहे.
मराठा समाजानंतर आता ओबीसी समाजही आक्रमक पवित्र्यात आला आहे. दसऱ्यानंतर 8 किंवा 9 ऑक्टोबर रोजी मुंबईत भव्य ओबीसी महामोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर आज ओबीसी समाजाच्या विविध संघटनांच्या नेत्यांची ऑनलाइन बैठक होणार असून, यामध्ये मोर्चाच्या अंतिम तारखेचा निर्णय घेतला जाणार आहे.मराठा समाजाला दिल्या जाणाऱ्या कुणबी प्रमाणपत्रांमुळे ओबीसी आरक्षण धोक्यात येईल, अशी चिंता ओबीसी संघटनांकडून व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये दसऱ्यानंतर भव्य मोर्चाचे आयोजन केले जात आहे. 8 किंवा 9 ऑक्टोबर रोजी मोर्चा पार पाडण्याचा प्रस्ताव असून, आजच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार आहे. माजी उपमुख्यमंत्री व ओबीसी नेते छगन भुजबळ देखील या बैठकीला ऑनलाइन उपस्थित राहण्याची शक्यता आहे.


