राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत असताना राजकीय पक्षांमध्ये उलथापालथ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आपापल्या सोयीनुसार नेते, पदाधिकारी पक्षबदल करत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सोलापूरमधील नेते शिवाजी सावंत यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. आता पुन्हा सोलापूरमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे सोलापूरातील नेते शिवाजी सावंत यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. सावंत शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर सोलापुरातील शिंदे गटाच्या ११ पदाधिकाऱ्यांनी पक्षातून राजीनामे दिल्याचे समोर आले आहे. यामध्ये उपजिल्हाप्रमुख, जिल्हा समन्वयक अशा वेगवेगळ्या तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
‘अधिकार नसलेले काहीजण हे पदाधिकारी निवड करत आहेत. शिवाजी सावंत यांच्या तालुक्यामधील निवड लोकसभा संपर्कप्रमुख असलेली व्यक्ती करत आहे. याबाबत आम्ही एकनाथ शिंदे यांना सांगितले होते, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. यामुळे आम्ही सामूहिकरित्या राजीनामे दिले आहेत’, अशी माहिती सोलापूरमधील शिंदे गटाचे जिल्हा समन्वयक दिलीप कोल्हे आणि हरिभाऊ चौगुले यांनी दिली आहे.
सोलापूरमध्ये शिवाजी सावंत यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला धक्का बसल्याचे म्हटले जात होते. आता शिवाजी सावंत यांच्या पाठोपाठ जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने सोलापूरातील शिंदेसेनेची ताकद कमी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.


