Wednesday, November 5, 2025

अहिल्यानगर भाजप जिल्हाध्यक्ष पदासाठी आता वयाची अट, इतर निकष लागू !

अहिल्यानगरः भारतीय जनता पक्षाने जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी इच्छुक उमेदवारास प्रथमच वयाची अट व इतर निकष लागू केले आहेत. त्याचबरोबर निवड प्रक्रियेतही बदल केला आहे. जिल्हाध्यक्ष पदासाठी ४५ ते ६० अशी वयाची अट लागू केली आहे. नवीन पक्षप्रवेश झालेल्या कार्यकर्त्याचा जिल्हाध्यक्ष पदासाठी विचार केला जाणार नाही तसेच आमदार किंवा खासदाराचीही जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती होणार नाही, असे नवे निकष लागू करण्यात आले आहेत. महाराष्ट्रभर या नवीन निकषानुसार निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

भाजपने यंदा संघटन पर्व म्हणून जाहीर केले आहे. सदस्य नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मंडलाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया सध्या सुरू आहे. या प्रक्रियेनुसार काल, रविवारी पक्षाने नियुक्त केलेले निवडणूक पर्यवेक्षक तथा मंत्री जयकुमार रावल व निवडणूक निरीक्षक लक्ष्मण सावजी (अहिल्यानगर महानगर), आमदार विक्रमसिंह पाचपुते (अहिल्यानगर उत्तर) व बाळासाहेब सानप (अहिल्यानगर दक्षिण) यांनी शिर्डीमध्ये थांबून या नवीन निकषानुसार निवड प्रक्रिया राबवली. आता त्याचा अहवाल प्रदेशच्या छाननी समितीकडे पाठवला जाणार आहे. त्यानंतर तीन-चार दिवसांत जिल्हाध्यक्ष पदाची नावे जाहीर केली जाणार आहेत.

जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवारास वयाची अट लागू करतानाच इच्छुक उमेदवाराने यापूर्वी संघटनेत जबाबदारीच्या पदावर काम केलेले असावे, दोन टर्म सक्रिय सदस्य असलाच पाहिजे, महिला- एससी-एसटी यांची नावे मंडल पातळीवरून आली पाहिजेत. अनुशासित व प्रामाणिक व्यवहार करणारा असावा, असे निकष लागू केले आहेत.पूर्वी निवड प्रक्रिया प्रदेश पातळीवर नियुक्त केलेल्या निरीक्षकांमार्फत इच्छुकांच्या मुलाखत घेऊन राबवली जात होती. आता मुलाखती टाळण्यात आल्या आहेत. त्याऐवजी काही ठरावीक पदाधिकाऱ्यांना शिफारस करण्यास सांगण्यात आले आहे. ही शिफारस कोण करू शकतो याची यादीही निवडणूक निरीक्षकांना प्रदेशकडून दिली गेली आहे. ही शिफारस करताना इच्छुक कसा लायक आहे, हे प्रपत्रात नमूद करायचे आहे.

जिल्हाध्यक्ष पदासाठी तेथील रहिवासी असलेले राष्ट्रीय व प्रदेश पदाधिकारी, प्रदेश कोअर ग्रुप सदस्य, विभाग संघटन मंत्री, मोर्चाचे पदाधिकारी, राज्यसभा व लोकसभेचे खासदार, माजी खासदार, आमदार, विधानसभा लढलेले उमेदवार, विद्यमान जिल्हाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, प्रकोष्ट पदाधिकारी, प्रवासी कार्यकर्ते यांना शिफारस करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

वयाची अट व इतर निकष यामुळे अहिल्यानगरमधील महानगर, दक्षिण व उत्तर या तीन जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेले अनेक उमेदवार शिफारसीपूर्वीच बाद ठरले आहेत, त्यामुळे इच्छुकांचा हिरमोड झाला.भाजपमध्ये इतर पक्षांतून अनेक नेते व त्यांचे समर्थक अलीकडच्या काळात दाखल झाले आहेत. पक्षाचे पदाधिकारी निवडताना जुन्या व नव्या कार्यकर्त्यांचे वाद होत आहेत. संघटनेवर ताबा मिळवण्यासाठी त्यांच्यामध्ये चढाओढ सुरू आहे. याबरोबरच संघटना चालवण्यासाठी अनुभवी कार्यकर्ता असावा, यातून हे निकष लागू केल्याचे जिल्ह्यातील काही पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. काही पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार नव्या निकषामुळे निष्ठावानांना न्याय मिळणार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles