Friday, February 20, 2026

कृषी सेवा केंद्रातून कंपनीचे बोगस औषध ;नगर जिल्ह्यात कृषी दुकानावर कृषी विभागची कारवाई

श्रीरामपूर तालुक्याचे पूर्व परिसरातील खोकरफाटा येथील कृषी सेवा केंद्रातून एका नामांकित कंपनीचे बोगस औषध मिळाल्याचे शेतकर्‍यांचे तोंडी तक्रारीवरून तालुका गुणनियंत्रण तथा कृषी अधिकार्‍यांनी दुकानाची तपासणी केल्यानंतर त्या तक्रारीत तथ्य आढळून आले नाही, मात्र रासायनिक खताच्या बाबतीत काही त्रुटी आढळल्याने कृषी विभागाने माऊली कृषी सेवा केंद्राचा रासायनिक खत परवाना सहा महिन्यांसाठी निलंबीत केला आहे.तालुका कषी अधिकारी यांच्या वतीने माळवाडगाव येथे डाळिंब, कापुस, सोयाबीन या पिकाचे डॉ. प्रफुल गाडगे यांच्या पिक चर्चासत्राचे आयोजन केले होते. या चर्चासत्रानंतर दोन शेतकर्‍यांनी खोकरफाटा येथील माऊली कृषी सेवा केंद्रातून रासायनिक औषधांची खरेदी केली. त्या बाटल्या बनावट असल्याची तोंडी तक्रार केली होती. तालुका कषी अधिकारी अभय थोरात यांनी दोन्ही शेतकर्‍यांना लेखी तक्रार देण्यास सांगितले. शेतकरी लेखी तक्रार देण्यास तयारही झाले नाही. त्यांनी दाखविलेल्या दोन बाटल्या व बील देखील देण्यास नकार दिला. ही चर्चा सर्वत्र पसरून दुकान मालकापर्यंत गेली. मालक आणि शेतकर्‍यात चर्चा घडवून प्रकरण शांत झाले होते. मात्र हे प्रकरण मिटण्यात येऊ नये म्हणुन काही शेतकरी, शेतकरी संघटनेकडे गेले.

या प्रकरणात शेतकरी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी वर्तमान पत्रातून संबंधितांच्या नावाचा उल्लेख न करता रास्तारोकोचा इशारा दिल्यानंतर तालुका गुणनियंत्रण अधिकारी तथा तालुका कृषी अधिकारी अभय थ़ोरात व सहकार्‍यांनी सदर दुकानची तपासणी केली असता त्या शेतकर्‍यांचे तक्रारीबाबतचे कुठलेही पुरावे आढळुन आले नाही. परंतू याच तपासणीत रासायनिक खतांचा साठा फलक व दर सुची ग्राहकास ठळक दिसेल अशा ठिकाणी प्रदर्शीत केलेला नाही. दुकानात विक्रीस ठेवण्यात आलेल्या सर्व उत्पादनांचा स्त्रोतांचा समावेश केलेला नाही. साठा रजिष्टर मधील शिल्लक खतसाठा व प्रत्यक्षातील खतसाठा जुळत नाही. खताची विक्री कमाल विक्रीपेक्षा जास्त दराने करणे अशा प्रकारच्या त्रुटी आढळल्या त्या अनुशंगाने संबंधितांना खुलासा मागीतला असता सुनावणी दरम्यान सादर केलेला खुलासा समर्पक नसल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणी अहिल्यानगरचे जिल्हा कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांचेकडे दि.21 ऑगष्ट रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान श्रीरामपूरचे तालुका कृषी अधिकारी उल्हास राक्षे, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक आर. बी. ढगे, गुणनियंत्रण कृषी अधिकारी अभय थोरात, तसेच भोकर शिवारातील खोकर फाटा येथील माऊली कृषी उद्योगचे ज्ञानेश्वर उंडे हे उपस्थीत होते. या प्रकरणात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचे आदेशानुसार खत नियंत्रण आदेश 1985 चे कलम 31 नुसार मे. माऊली कृषी उद्योग भोकर यांचा खत विक्रीचा परवाना दि.21 ऑगष्ट 2025 ते दि.20 फेब्रुवारी 2025 या कालावधीकरीता निलंबीत करण्यात आला आहे. या आदेशानुसार संबधीतांना आता निलंबन कालावधीत खत निविष्ठांचा कसलाच खरेदी, विक्री व्यवहार करता येणार नसल्याचे म्हटले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles