राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते तथा राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्य करत असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून एक विधान केलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर राज्यभरातून टीका झाली होती. आता नुकतंच कृषीमंत्री कोकाटे यांनी पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं.
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची नाशिकमध्ये पाहणी करताना कोकाटे यांनी ढेकळांचे पंचनामे करायचे का? असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर पुन्हा एका कार्यक्रमात बोलताना कृषी खातं ही ओसाड गावची पाटीलकी असल्याचं विधान माणिकराव कोकाटे यांनी केलं होतं. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री कोकाटे यांची कानउघाडणी करत एक मोलाचा सल्ला दिला आहे. ‘काही गोष्टी बोलून का दाखवता? मनात ठेवायच्या असतात’, असं म्हणत मला हे वादग्रस्त वक्तव्य फार महागात पडतंय, असं अजित पवार यांनी आज माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
“माणिकराव कोकाटे यांना मी काही दिवसांपूर्वी देखील सांगितलं होतं की शेतकऱ्यांच्या बाबतीत असं वक्तव्य होता कामा नये. शेवटी तो आपला बळीराजा आहे. शेतकरी हा लाखाचा पोशिंदा आहे. सर्वच गोष्टी आम्हाला देखील माहिती आहेत. आम्ही देखील शेतकरी आहेत. पण काही गोष्टी बोलून कशाला दाखवायच्या? मनात ठेवायच्या. पण माणिकराव कोकाटे यांना अजून अशा काही गोष्टी मनात ठेवायची सवय नाही, त्यामुळे हे होत आहे. पण हे मला फार महागात पडतंय”, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
“कापणी झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार?” असा सवाल करत “ढेकळांचे पंचनामे करायचे का”, असा सवाल कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांशी बोलताना केला होता. तसेच घरात आणून ठेवलेल्या मालाचे पंचनामे करता येणार नाहीत. शेतात नुकसान झालेले कांदा आणि अन्य जी पिके असतील, त्यांचे रितसर पंचनामे केले जातील, असं कृषीमंत्री कोकाटे यांनी म्हटलं होतं.


