प्रतिनिधी : मध्य शहरास बाजारपेठ एकाच वेळेला चोहोबाजूंनी खांदून ठेवत ऐन पावसाळ्यात व्यापारी, सर्वसामान्य नगरकरांची प्रचंड पिळवणूक मनपा प्रशासन करत आहे. विकासाच्या नावाखाली नियोजन शून्य कारभार सुरू असून आंधळ दळतंय, कुत्र पीठ खातय अशी शहराची दैनावस्था मनपा प्रशासन आणि सत्तेचा रिमोट कंट्रोल असणाऱ्या सत्ताधारी महायुतीने केला आहे. आता खूप झालं. नगरकरांसाठी हे सहन करण्या पलीकड गेल आहे. मध्य शहर, बाजारपेठेतील रखडलेली काम नियोजनबद्ध रित्या जलद गतीने पूर्ण करा. अन्यथा मनपाला तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ठाकरे शिवसेनेच्या वतीने शहर प्रमुख किरण काळे यांनी आयुक्त यशवंत डांगे यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. कचरा संकलन यंत्रणेचा बोजवारा उडाला असून मनपाने संपूर्ण शहराचीच कचराकुंडी करत नगरचा नरक केल्याचा हल्लाबोल यावेळी चित्रा टॉकीज परिसराची पाहणी करताना काळे यांनी केला.
शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये असणाऱ्या चित्रा टॉकीज परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर कचरा साचला आहे. नागरिकांच्या तक्रारीनंतर या परिसराची शहरप्रमुख काळे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यां समवेत प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी बोलताना तीव्र संताप व्यक्त करत मनपा प्रशासनाच्या गलथान कारभाराचे त्यांनी वाभाडे काढले. यावेळी उपजिल्हाप्रमुख रावजी नांगरे, कामगार आघाडीचे नेते विलास उबाळे, शहर कामगार सेना प्रमुख गौरव ढोणे, युवा सेना अहिल्यानगर विधानसभा युवा अधिकारी आनंद राठोड, सुनील भोसले, व्यापारी आघाडीचे महावीर मुथा, ओबीसी आघाडीचे गणेश आपरे, किशोर कोतकर, सामाजिक न्याय विभागाचे विकास भिंगारदिवे, बबन आढाव, जयराम आखाडे, बाबासाहेब वैरागर, मागासवर्गीय विभागाचे रोहिदास भालेराव, देवराम शिंदे, दीपक काकडे, आकाश आल्हाट, आनंद जवंजाळ आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
काळे यांनी निवेदनात म्हटले आहे, पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावर साचलेला कचरा कुजल्यामुळे प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मनपाला आजवर अनेक वेळा स्वच्छतेच्या उत्तम कामगिरीबद्दल शासनाची विविध नामांकन व पारितोषिक प्राप्त झाल्याचा गवगवा सातत्याने केला जातो. मात्र चित्रा टॉकीजसह संपूर्ण शहरातील नागरिकांना प्रत्यक्ष दैनंदिन जीवनामध्ये कचरा संकलनाच्या बाबतीमध्ये येणारा अनुभव हा अत्यंत वाईट आहे. शहराच्या अनेक भागांमध्ये आजही घंटागाडी दररोज येत नाही. आलीच तर त्याच्या वेळा निश्चित नाहीत. त्यातही ती एखाद्या परिसरात गेली तर नागरिक बाहेर येऊन कचरा टाकण्या आधीच गाडी पुढे निघून गेलेली असते. नागरिक दोन दिवसांपेक्षा अधिक काळासाठी घरामध्ये कचरा साठवून ठेवू शकत नाहीत. नाइलाजास्तव हा सर्व कचरा नागरिकांना रस्त्यावरच टाकण्याची अपरिहार्यता निर्माण होते.
मनपाच्या कचरा संकलन विभागाचा नियोजन शून्य कारभार या स्थितीला जबाबदार आहे. त्यामुळे संपूर्ण शहराची कचराकुंडी, उकिरडा झाला आहे. त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून मनपाला आजवर शहर स्वच्छतेची मिळालेली पारितोषिक आपण स्वतःहून ती शासनाला परत केली पाहिजेत. कारण ही बिरूदावली मिरविण्याचा कोणताही अधिकार हा मनपाला राहिलेला नसल्याचे काळे यांनी म्हटले आहे.
चितळे रोड ते चित्रा टॉकीज ते लक्ष्मी कारंज चौक ते पटवर्धन चौक या मार्गावर ड्रेनेज, रस्त्याची कामे सुरू आहे. या कामाची पाहणी किरण काळे यांनी केली. पाणी नंतर संताप व्यक्त करताना काळे म्हणाले, पावसाळ्यापूर्वी मनपा प्रशासन झोपले होते काय ? पावसाळ्यापूर्वी ही कामे सुरू करून पूर्ण करण्याची गरज होती. मात्र ऐन पावसाळ्यामध्ये हा संपूर्ण परिसर अक्षरशः एकाच वेळेला दोन्ही बाजूने खोदून ठेवून या परिसरातील नागरिक, व्यापाऱ्यांचे तसेच मोठ्या प्रमाणावर या भागातून जाणाऱ्या नगरकरांचे जगणे मुश्किल केले आहे.
काळे पुढे म्हणाले, बरं एवढेच नाही तर या परिसरामध्ये मार्कंडेय विद्यालय, प्रगत विद्यालय, कै. वि. ल. कुलकर्णी प्रशाला, पुढील बाजूला बाई इचरचबाई प्रशाला, यासारख्या मोठ्या शाळा तसेच स्नेहालय संचलित उडान प्रकल्प, अनाम प्रेम सारखी सामाजिक संस्था असून यामधून हजारो विद्यार्थी, पालक रोज ये जा करतात. गांधी मैदान आणि परिसरामध्ये दूध, भाजीपाला विक्रेते तसेच अन्य व्यापारी आस्थापना व रहिवासी देखील राहतात. या सगळ्यांच्या रोजगार आणि राहण्यावर याचा गंभीर परिणाम होत आहे. विद्यार्थ्यांचा, नागरिकांचा अपघात झाला तर रुग्णालयापर्यंत पोहचणे सुद्धा शक्य होणार नाही अशी परिस्थिती आहे. हीच परिस्थिती शहराच्या मध्यवर्ती भागात बहुतांश ठिकाणी असून विकास कामांच्या नावाखाली बाजारपेठेचे अर्थकारण संपूर्ण बाजारपेठ एकाच वेळी खोदून ठेवल्यामुळे प्रचंड अडचणीत आले आहे. यामुळे बाजारपेठ, व्यापारी उध्वस्त होण्याची वेळ आली आहे. लहान मुलं, विद्यार्थी, पालक, व्यापारी, ग्राहक अशा सर्वांनाच वेठीस धरण्याचं काम मनपा प्रशासन करीत आहे.
आयुक्त, मनपा अधिकारी, शहराचे लोकप्रतिनिधी, सत्ताधारी महायुतीचे माजी आणि भावी नगरसेवक शहरात सध्या विविध ठिकाणी भेटी देत फोटोसेशन करताना नगरकरांना पाहायला मिळतात. मात्र प्रत्यक्षात नियोजन शून्य काम आणि कामांना नसणारी गती, अनेक वेळा बंद पडणारी कामं, यामुळे महिनोन महिने हा प्रकार असाच सुरू राहण्याचे चित्र दिसते आहे. याबाबत मनपा आयुक्तांनी शहराच्या मध्य बाजारपेठेतील सुरू असणाऱ्या सर्व प्रकारच्या कामांशी निगडित अधिकारी, कर्मचारी, ठेकेदार यांना नियोजनबद्ध, तातडीने, जलद गतीने सर्व कामे पूर्ण करण्याबाबत सूचना कराव्यात, अशी मागणी ठाकरे शिवसेनेने केली आहे. याबाबत आपण योग्य ती पावले न उचलल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा किरण काळे यांनी दिला आहे.
चित्रा टॉकीज परिसरामध्ये रस्त्यावर साचलेला कचरा दोन दिवसांच्या आत उचलून परिसर स्वच्छ न केल्यास सदर ठिकाणी “शहराची कचराकुंडी केल्या बद्दल मनपा प्रशासन, सत्ताधारी महायुतीचे आभार” मानणारा जाहीर फलक लावून जाहीर निषेध करण्याचा इशारा ठाकरे शिवसेनेने दिला आहे. त्यानंतरही आवश्यक ती कार्यवाही न केली गेल्यास नागरिकांना काय यातना होतात याची मनपाला जाणीव व्हावी याकरिता सदर दुर्गंधीयुक्त कचरा हा शिवसेना मनपा कार्यालयात घेऊन येत मनपाच्या दारात बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा किरण काळे यांनी दिला आहे.


