अहिल्यानगर -जिल्हा परिषदेचे ७५ गट आणि पंचायत समितीच्या १५० गणांसाठी १३ ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडत झाली होती. त्यानंतर तीन दिवसांत केवळ चार हरकत दाखल झाल्या असून हरकत नोंदवायचा शुक्रवार (दि. १७) शेवटाचा दिवस होता. आरक्षण प्रक्रिया संपल्याने आता प्रशासन प्रत्यक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. दरम्यान, दाखल गट आणि गण आरक्षणावरील हरकती निकाली काढण्यात येवून ३१ ऑक्टोबरला अंतिम आरक्षण जाहीर होणार आहे.जिल्हा परिषदेच्या ७५ गटांच्या आरक्षणाची सोडती १३ ऑक्टोबरला काढण्यात आली होती. या आरक्षणाबाबत हरकती घेण्यासाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदत होती. परंतु जिल्हा परिषदेच्या आरक्षणाबाबत तीन व पंचायत समितीच्या एका गणासाठी अशा चार हरकती दाखल झाल्या आहेत. या हकरतींचा गोषवरा अभिप्रायासह जिल्हाधिकारी विभागीय आयुक्तांना सादर करणार असून ३१ ऑक्टोबरपर्यंत हरकती व सूचनांचा विचार करून विभागीय आयुक्त आरक्षण अंतिम करणार आहेत. ३ नोव्हेंबरपर्यंत अंतिम आरक्षणाचे राजपत्र प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
जिल्हा प्रशासनाकडून अंतिम मतदार यादी आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादी २७ ऑक्टोबर रोजी जाहीर केली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी अखेर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यासाठी आदेश दिले असून त्यानुसार आता मतदानासाठीच्या यंत्रांचेही नियोजन सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यातील चौदा तालुक्यात प्रत्येक गावी यासाठी मतदान केंद्रे करावी लागतात. त्यामुळे प्रशासनाला मोठी यंत्रणा उभारावी लागते. त्यादृष्टिनेही प्राथमिक तयारी सुरू करण्यात आली असून दिवाळी संपल्यानंतर नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जिल्ह्यातील १४ तालुक्यातील ७५ गट व १५० गणांसाठी निवडणूक आयोगाने अंतिम मतदार यादी केल्यानुसार (१ जुलै २०२५) ३० लाख ७ हजार ४०४ मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीची मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी ३ हजार ६८९ मतदान केंद्र प्रस्तावित केले आहेत. या मतदान केंद्रावर ४ हजार १३२ कंट्रोल युनिट व ८ हजार २६३ बॅलेट युनिटची आवश्यकता आहे. तर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ३ हजार २५५ कंट्रोल युनिट व २ हजार ९१ बॅलेट युनिट व २ हजार ४६४ मेमरी उपलब्ध आहेत.
जिल्हा परिषदेच्या गट आरक्षणाबाबत नेवासा तालुक्यातील भेंडा व प्रवरासंगम येथून प्रत्येकी एक हरकत दाखल झाली आहे. तर वंचित बह्णन आघाडीच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आरक्षण प्रक्रियेवर हरकत घेण्यात आली आहे. बोधेगाव पंचायत समिती गणासाठी बालमटाकळी येथील एका व्यक्तीने हरकत दाखल केली आहे.


