अहिल्यानगर – दरवर्षी जिल्हा परिषदेतर्फे दिले जाणारे जिल्हा शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत. शिक्षकदिनी (दि. ५) गेल्या तीन वर्षांचे पुरस्कार वितरण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
दरवर्षी शिक्षक दिनाच्या दिवशी उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व केंद्रप्रमुख यांना जिल्हा शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येते. या प्रक्रियेसाठी शिक्षक व केंद्रप्रमुख यांची १०० गुणांची प्रश्नावली अद्ययावत करून जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शिक्षक व केंद्रप्रमुखांनी पंचायत समिती कार्यालयामध्ये स्वयंमूल्यमापन करून प्रश्नावली जमा केली. प्रत्येक तालुक्यातून आलेल्या प्रस्तावांची गटशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी (शिक्षण) यांच्यामार्फत पडताळणी होऊन ३ शिक्षक (त्यामध्ये एक शिक्षिका) व एक केंद्रप्रमुख यांचे प्रस्ताव जिल्हा कार्यालयास पाठविण्यात आले. जिल्हास्तरावरून गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी (शिक्षण) व केंद्रप्रमुख यांच्याकडून तालुके बदलून पथक परीक्षण करण्यात आले. त्याचप्रमाणे प्रस्ताव प्राप्त शिक्षक व केंद्रप्रमुख यांची २५ गुणांची लेखी परीक्षा घेण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समितीची बैठक होऊन पथकाकडून प्राप्त १०० गुणांची प्रश्नावली व लेखी परीक्षेचे २५ गुण असे एकूण १२५ गुणांपैकी ज्यांना सर्वात जास्त गुण मिळाले अशा प्रत्येक तालुक्यातून एक शिक्षक यांचा प्रस्ताव नाशिक विभागीय आयुक्तांच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला. त्यातून २०२४-२०२५ या वर्षासाठीचे पुरस्कार जाहीर करण्यात आले. विशेष म्हणजे २०२३ व २०२४ या दोन वर्षांचे पुरस्कार त्या-त्या वेळी जाहीर झाले. परंतु त्याचे वितरण झालेले नव्हते. त्यामुळे आता तीनही वर्षांचे एकत्रित पुरस्कार वितरण शुक्रवारी होत आहे.
यांची प्रमुख उपस्थिती
कल्याण रोडवरील द्वारका लाॅन येथे शुक्रवारी सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होत असून पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे असतील. दोन्ही खासदार व सर्व आमदारांसह जिल्हाधिकारी डाॅ. पंकज आशिया, सीईओ आनंद भंडारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण होणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भास्कर पाटील, संध्या गायकवाड (माध्यमिक) व बाळासाहेब बुगे (योजना) यांनी दिली.
पुरस्कारप्राप्त शिक्षक (२०२५)
अनिल डगळे (अकोले), कैलास भागवत (संगमनेर), मंगला गोपाळे (कोपरगाव), मंगल भडांगे (राहाता), सुजित बनकर (श्रीरामपूर), जयश्री झरेकर (राहुरी), रूपाली खेडकर (नेवासा), विठ्ठल देशमुख (पाथर्डी), खंडेराव सोळंके (जामखेड), आबा सूर्यवंशी (कर्जत), नवनाथ वाळके (श्रीगोंदा), सचिन ठाणगे (पारनेर), वर्षा कासार (नगर), विजय भांगरे (केंद्रप्रमुख अकोले), रामदास बाबागोसावी (केंद्रप्रमुख नगर).
पुरस्कारप्राप्त शिक्षक (२०२४)
पुष्पा लांडे (अकोले), संजय कडलग (संगमनेर), पीतांबर पाटील (कोपरगाव), ललिता पवार (राहाता), योगेश राणे (श्रीरामपूर), सुनील लोंढे (राहुरी), सुनील अडसूळ (नेवासा), गोरक्षनाथ बर्डे (शेेवगाव), नामदेव धायतडक (पाथर्डी), बाळू जरांडे (जामखेड), दीपक कारंजकर (कर्जत), स्वाती काळे (श्रीगोंदा), प्रकाश नांगरे (पारनेर), वर्षा कचरे (नगर), ज्ञानेश्वर जाधव (केंद्रप्रमुख शेवगाव).
पुरस्कारप्राप्त शिक्षक (२०२३)
नरेंद्र राठोड (अकोले), सोमनाथ घुले (संगमनेर), सचिन अढांगळे (कोपरगाव), भारती देशमुख (राहाता), सविता साळुंके (श्रीरामपूर), अनिल कल्हापुरे (राहुरी), सुनीता निकम (नेवासा), अंजली चव्हाण (शेवगाव), भागिनाथ बडे (पाथर्डी), एकनाथ चव्हाण (जामखेड), किरण मुळे (कर्जत), जावेद सय्यद (श्रीगोंदा), विजय गुंजाळ (पारनेर), साधना क्षीरसागर (नगर), रावजी केसकर (केंद्रप्रमुख, पारनेर), अशोक विटनोर (केंद्रप्रमुख, श्रीरामपूर).


