Ahilyanagar….तमाशा कलावंतांवर जमावाचा हल्ला ; महिलांचा विनयभंग

संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील वरूडी फाटा येथे तमाशा कलावंतांच्या वाहनाला एका वाहनचालकाने कट मारत, इतरांना बोलावून घेत कलावंतांना बेदम मारहाण केली. या घटनेत महिला कलावंतांशी असभ्य वर्तन करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवार दिनांक 1 एप्रिल रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली आहे. हे सर्व कलावंत राष्ट्रपती सुवर्णपदक विजेत्या दिवंगत विठाबाई भाऊ नारायणगावकर यांच्या तमाशा फडातील आहेत.

घारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोखरी बाळेश्वर येथे मंगळवार दिनांक 31 मार्च रोजी कार्यक्रम पार पडल्यानंतर हे कलावंत बुधवारी माळेगाव पठार येथे पुढील कार्यक्रमासाठी वाहनातून जात होते. वरूडी पठार येथील एका पेट्रोल पंपावर इंधन भरल्यानंतर ते पुढे निघाले असता, एका वाहनाने त्यांच्या वाहनाला कट मारला. यानंतर संबंधित वाहनचालकाने आपले वाहन आडवे लावत तमाशा कलावंतांच्या चालकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने इतर काही जणांना बोलावून घेतले. सर्वांनी मिळून कलावंतांना मारहाण केली.

महिलांनाही मारहाण करण्यात आली असून त्यांची काही रक्कम चोरून नेल्याचा आरोप आहे, अशी माहिती विठाबाई नारायणगावकर यांचे नातू मोहित नारायणगावकर यांनी दिली.दरम्यान, तमाशा कलेतील उत्कृष्ट योगदानासाठी दिवंगत विठाबाई नारायणगावकर यांना दोन वेळा राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदक प्रदान करण्यात आले होते. त्यांच्या फडातील कलावंतांवर झालेल्या या हल्ल्याचा राज्यभरातील तमाशा आणि लोककलावंतांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

डायल 112 क्रमांकावर संपर्क झाल्यानंतर आम्ही तात्काळ दोन वाहने घेऊन घटनास्थळी पोहोचलो. जखमींना पोलिस ठाण्यात आणून पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपींची नावे निष्पन्न होताच त्यांना लवकरात लवकर अटक केली जाईल.
– हेमंत थोरात (सहायक पोलिस निरीक्षक, घारगाव)

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles