अहिल्यानगर जिल्ह्यात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या सात बांगलादेशी महिलांना मायदेशी परत पाठवण्याचे आदेश दिले आहे. पारपत्र कायदा आणि परदेशी नागरिक कायद्यांतर्गत दोषी ठरवले असून त्यांची बांगलादेशात पाठवणी करावी असेही निकालात नमूद केले आहे.
पोलीस अधीक्षकसोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली १७ डिसेंबर रोजी ते २४ डिसेंबर दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या पथकाने नगर तालुक्यातील रुईछत्तीशी येथून बांग्लादेशी महिलांना ताब्यात घेतले होते. चौकशीमध्ये त्यांच्याकडे वैध प्रवासी कागदपत्रे नसल्याचे आढळून आले, तसेच त्यांनी भारत सरकारने अधिकृत केलेल्या मार्गाव्यतिरिक्त भारतीय सीमेमार्गे प्रवेश केला होता. सदर प्रकरणात कारवाई करताना गुन्हे नोंदवून न्यायालयात खटले दाखल करण्यात आले होते.
या सातही महिलांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपपत्र सादर केले होते. भारतीय पुरावा कायद्याच्या कलम 106 नुसार, आरोपी महिलांनी आपण भारतीय आहोत हे सिद्ध करणे आवश्यक होते. मात्र, ते सिद्ध करण्यात अपयश आले. देशात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या या आरोपी महिलांची बांगलादेशात रवानगी करावी, असा प्रस्ताव पोलीस निरीक्षक धनंजय अनंतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ किशोर पठारे, पोकों अमोल राऊत यांनी मांडला होता.
केंद्रीय गुप्तचर यंत्रणा तसेच सीमा सुरक्षा बल, कोलकाता यांच्यासोबत सतत समन्वय ठेवून प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर वरिष्ठ कार्यालयाकडुन ७ बांग्लादेशी महिलांना मायदेशी परत पाठवण्याचा आदेश प्राप्त झाला. त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.
तरुणावर जीवघेणा हल्ला
शहरातील स्टेट बँक चौक परिसरात जुन्या वादातून तरुणाला लोखंडी फायटरने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिसांनी आठ जणांच्या टोळक्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अशोक भीमराव कुत्तरवाडे (वय ३१, रा. बाराबाभळी) यांनी फिर्याद दिली. फिर्यादी १९ जानेवारी रोजी सायंकाळी स्टेट बँक चौकातून जात असताना हा हल्ला झाला. संशयित आरोपी गौरव कराळे आणि सोनू कराळे यांच्यासह आठ जणांच्या टोळक्याने फिर्यादींना गाठले. मागील भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी मारहाण केली, तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि जगदीश मुलगीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल इनामदार करत आहे.


