तपोवन रोडवर तरुणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
अहिल्यानगर: शहरातील तपोवन रोड परिसरातील साईनगर येथे जुन्या वादातून एका तरुणावर लोखंडी रॉड आणि लाथाबुक्क्यांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला. या घटनेत विशाल बाळू शिंदे हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्या चुलत भावालाही मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी विशाल शिंदे (वय २२) हा तपोवन रोडवरील साईनगर भागात राहतो. शनिवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास तो घराच्या पाठीमागील मैदानावर असताना आरोपींनी त्याला गाठले. यावेळी आकाश संजय पवार (रा. भिंगार), संतोष भानुदास शिंदे, गणेश दामू धोत्रे, गौरव भानुदास शिंदे (तिघे रा. तपोवन रोड) आणि विशाल गायकवाड (रा. पाईपलाईन रोड) यांनी जुन्या कारणावरून विशालला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपींनी विशालवर लोखंडी रॉडने प्रहार केले. यावेळी विशालचा चुलत भाऊ विजय शिंदे हा मध्यस्थी करण्यासाठी आला असता, आरोपींनी त्यालाही बेदम मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या हल्ल्यानंतर जखमी विशालला उपचारासाठी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातील जबाबानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, महिला पोलीस हवालदार संजीवनी नेटके या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
……………………………………………………………………………………………………………………………………….
बोल्हेगाव फाटा येथे तरुणाला मारहाण; ओम नरेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
अहिल्यानगर: बोल्हेगाव फाटा परिसरातील नम्रता हॉटेलजवळ एका तरुणाला अडवून त्याला लोखंडी वस्तूने बेदम मारहाण करण्यात आली. तसेच त्याच्या खिशातील ४ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ओम नरे आणि त्याच्या दोन मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिनव सुरेश नवगिरे (वय २५, रा. बोल्हेगाव फाटा) हा तरुण आपल्या खोलीवरून मित्राच्या घरी जात होता. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास तो नम्रता हॉटेलजवळ पोहोचला असता, एका दुचाकीवरून ओम नरे आणि त्याचे दोन साथीदार तिथे आले. त्यांनी अभिनवला विनाकारण अडवून अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपींनी त्याला लाथाबुक्क्यांनी आणि सोबत आणलेल्या लोखंडी वस्तूने गंभीर मारहाण केली. मारहाण करत असतानाच आरोपींनी अभिनवच्या शर्टच्या खिशातील ४ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले आणि ‘तुला जिवंत सोडणार नाही’ अशी धमकी देऊन तिथून पळ काढला.
या घटनेनंतर जखमी अवस्थेत अभिनवने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी ओम नरे व त्याच्या दोन मित्रांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार जाधव करत आहेत. शहरात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.


