Sunday, November 2, 2025

नगर शहरातील शांतता भंग करून कोणाला नेमकं काय साध्य करायचय? माजी महापौर अभिषेक कळमकर

नगर शहरातील शांतता भंग करून कोणाला नेमकं काय साध्य करायचय?

पोलिसांनी अपप्रवृत्तींचा पर्दाफाश करून धडा शिकवावा, अभिषेक कळमकर यांची मागणी

नगर : नगर शहरात मागील काही महिन्यात जातीय तणावाचे प्रकार वाढले आहेत. सोशल मिडियावर धार्मिक भावना दुखावणारा मजकूर व्हायरल करणे, प्रार्थना स्थळांची मोडतोड करणे, गोमांस रस्त्यावर टाकून जाणूनबुजून तणाव निर्माण करणे अशा घटना वाढल्या आहेत. सोमवारीही रांगोळीवरुन धार्मिक भावना दुखावण्याचा प्रकार घडला. यानंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी लाठी चार्ज करावा लागला. ऐन सणासुदीत शहरातील सामाजिक सलोखा बिघडत चालला आहे. सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिक, व्यापारी, छोटे व्यावसायिक भयभीत झाले आहेत. मागील डिसेंबर महिन्यापासून शहरात जातीय सलोखा बिघडवणाऱ्या घटना वाढल्या आहेत. याच्या मूळाशी जावून सखोल तपास करणे गरजेचे आहे. दोन्ही बाजूच्या काही निवडक अपप्रवृत्ती असे खोडसाळ प्रकार करून शहराची शांतता बिघडवत आहेत. त्यांना खतपाणी कोण घालत आहे, याचा शोध घेवून कायदेशीर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी केली आहे.

राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना अभिषेक कळमकर म्हणाले की, नगर शहरात मागील काही वर्षापासून जातीय तणावाच्या घटना जवळपास थांबल्या होत्या. सर्व धर्मिय सण उत्सव शांततेत पार पडत होते. मात्र मागील सात आठ महिन्यांपासून वारंवार शहरातील शांतता भंग होईल अशा घटना घडत आहेत. आजही कोठला येथे झालेल्या रास्ता रोकोनंतर पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. शहरात अफवांचे पीक पसरले. त्यामुळे पोलिसांच्या सूचनेनुसार छत्रपती संभाजीनगर महामार्गालगत असलेल्या शाळा सोडून देण्यात आल्या. शहराच्या बाजारपेठेतही व्यापारी धास्तावले. कोतवाली पोलिस ठाण्याच्या बाहेरही लाठीचार्ज करावा लागला. या सर्व घटनांची मालिका पाहता शहराची शांतता बिघडवून कोणाला नक्की काय साध्य करायचे आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

वास्तविक दसरा, दिवाळीसारखे मोठे सण नजीक आले आहेत. शहरातील व्यापारी, व्यावसायिकांनी कर्ज काढून कोट्यवधींचा माल विक्रीसाठी आणण्यास सुरुवात केली आहे. अशावेळी अनुचित प्रकार घडून शहराचे जनजीवन ठप्प झाल्यास व्यापाऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीस कोण जबाबदार राहिल. बाजारपेठेतील व्यापारावर अनेक गोरगरीब कुटूंबांचा रोजगार अवलंबून आहे. महिला वर्गही मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत कामास आहे. त्यांच्या उपजिविकेवरही परिणाम होण्याची भीती आहे. शहरातील बाजारपेठेला आधीच मरगळ आलेली असताना तणावाच्या वातावरणामुळे बाजारपेठेला कायमची घरघर लागू शकते याचाही विचार होणे आवश्यक आहे. येणाऱ्या काळात महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. अशावेळी राजकीय स्वार्थासाठी शहरातील वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न कितपत योग्य आहे याचाही विचार झाला पाहिजे.

पोलिस प्रशासनाने दरवेळी तणाव निर्माण झाल्यावर कुशलेतेने परिस्थिती हातळली आहे हे वेळोवेळी दिसून आले आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळत असला तरी पोलिसांनी गुप्तचर विभाग अधिक सक्षम करून अशा घटना घडवणाऱ्या दोन्ही बाजूच्या अपप्रवृत्तींचा शोध घेवून त्यांच्यावर कडक कारवाई करणे अपेक्षित आहे. राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यानगर शहरातील या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देवून पोलिस प्रशासनाला योग्य कारवाईच्या सूचना देणे अपेक्षित आहे. कारण सतत होणारे तणावपूर्ण वातावरण शहराचे सामाजिक, आर्थिक स्वास्थ्य बिघडवणारे ठरू शकते. समाजातील सूज्ञ, संवेदनशील तसेच प्रतिष्ठित नागरिकांनीही या प्रकाराबाबत आवाज उठवून सामाजिक सलोखा कायम राखण्याच्या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा आहे.

अहिल्यानगर शहरात शिवसेना उपनेते माजी आमदार दिवंगत अनिलभैया राठोड यांनी 25 वर्षे हिंदुत्वाची ठाम भूमिका घेवून विधानसभेत नगरचे प्रतिनिधीत्व केले. त्यांच्या मुशीत तयार झालेले अनेक कार्यकर्ते हिंदुत्वाच्या मुद्दयावर काम अजूनही काम करत आहेत. परंतु राठोड यांच्या कार्यकाळात कधीही सर्वसामान्यांचे नुकसान होईल अशी कृती व प्रकार शहरात झाले नाहीत, याकडेही कळमकर यांनी लक्ष वेधले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles