Tuesday, October 28, 2025

रस्त्यालगत बंद अवस्थेत लावलेली वाहने महानगरपालिका जप्त करणार, अतिक्रमणांवर कारवाईसाठी पुन्हा मोहीम राबवणार

रस्ते व फुटपाथवरील अतिक्रमणांवर कारवाईसाठी पुन्हा मोहीम राबवणार

रस्त्यालगत बंद अवस्थेत लावलेली वाहने महानगरपालिका जप्त करणार

अनधिकृत विक्रेत्यांनी रस्ते, फुटपाथ तात्काळ रिकामे करावेत, अन्यथा गुन्हे दाखल करणार

आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांचा इशारा

अहिल्यानगर – शहरातील रस्ते व फुटपाथवर ठिकठिकाणी अनधिकृत विक्रेत्यांनी व्यवसाय थाटले आहेत. तसेच, शहर व उपनगर परिसरात अनेक प्रमुख रस्त्यांवर, रस्त्यालगत बंद अवस्थेतील जुनी वाहने लावण्यात आली आहेत. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण झाला आहे. शहराच्या स्वच्छतेवरही त्याचा परिणाम होत असल्याने अशी वाहने महानगरपालिका कारवाई करून जप्त करणार आहे. सर्व प्रभाग समितीच्या प्रभाग अधिकाऱ्यांना व अतिक्रमण निर्मूलन विभागाला मोहीम राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित वाहन मालक व रस्ते, फुटपाथवरील अनधिकृत विक्रेत्यांनी तत्काळ अतिक्रमणे हटवून रस्ते मोकळे करावेत, अन्यथा गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिला आहे.

शहरातील रहदारीस अडथळा होणारी अतिक्रमणे व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महानगरपालिका सातत्याने आढावा घेऊन उपाययोजना करत आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत रस्त्यालगत लावण्यात आलेल्या जुन्या व बंद अवस्थेतील वाहने, फुटपाथवर होणारे अनधिकृत व्यवसाय यावर चर्चा झाली. मिस्किन मळा रोड, जुने कोर्ट रोड, स्वामी विवेकानंद चौक, लालटाकी अप्पू चौक ते सर्जेपुरा, साईनगर, भोसले आखाडा, कोठला, नवीपेठ, तोफखाना व मध्य शहरात प्रमुख रस्त्यांवर जुनी व बंद अवस्थेतील वाहने लावल्याची व त्यामुळे रहदारीस अडथळा होत असल्याचे, अस्वच्छता होत असल्याचे निदर्शनास आणण्यात आले. सदर वाहने तत्काळ काढून घ्यावीत. अन्यथा महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम २३० व २३१ अंतर्गत सदर वाहने बेवारस समजून ती तत्काळ जप्त करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

तसेच, दिल्लीगेट ते चितळे रोड हा रहदारीचा रस्ता असून, या ठिकाणी रस्त्यावर व्यवसाय थाटणाऱ्या विक्रेत्यांची संख्या वाढली आहे. या विक्रेत्यांनी आपले अनधिकृत व्यवसाय त्वरित हटवावेत, अन्यथा त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. नागरिकांनी रस्त्यावर रहदारीला अडथळा होईल, अशा पद्धतीने वाहने लावू नयेत, रस्त्यावर व फुटपाथवर व्यवसाय थाटून रहदारीला अडथळा निर्माण करू नये, अन्यथा संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल, असे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles