माजी सभागृह नेते अशोक बडे यांनी महापालिकेच्या माध्यमातून केले मदतकार्य
अहिल्यानगर : शहर व परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. जोरदार पावसामुळे सीना नदीला महापूर आला विशेषतः बोल्हेगाव गणेश चौक स्नेहनगर परिसरातील परिस्थिती गंभीर झाली आहे. या भागातील नागरिकांच्या घरामध्ये अक्षरशः गुडघ्याएवढे पाणी शिरले असून अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. घरगुती वस्तू, धान्य, फर्निचर यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
परिसरातील नागरिकांच्या या संकटसमयी माजी सभागृह नेते अशोक बडे यांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. त्यांनी थेट महापालिका प्रशासनाशी संपर्क साधून मदत पथके घटनास्थळी दाखल होण्यासाठी पुढाकार घेतला. स्वतः घटनास्थळी हजर राहून त्यांनी पूरग्रस्तांची विचारपूस केली व नागरिकांना आवश्यक ते सहकार्य मिळावे यासाठी प्रयत्न केले.
बोल्हेगाव परिसरातील पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पाणी उपसण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
या आपत्तीच्या काळात समाजबांधवांनी एकत्रित येऊन नागरिकांना धीर देण्याची गरज असल्याचे मत श्री. बडे यांनी व्यक्त केले.


