कोपरगाव तालुक्यात बोगस खत विक्री करणार्या दोघांविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी विभागाने सात लाख 81 हजार रूपये किमतीच्या 28.50 मे. टन खत साठ्यावर विक्री बंदी आदेश काढले आहेत.
कोपरगाव तालुका कृषी कार्यालयाचे गुण नियंत्रक गणेश बिरदवडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, जानेवारी महिन्यात कोपरगाव तालुक्यातील विविध दुकानातून विक्री होणार्या रासायनिक खतांचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यात महालक्ष्मी फर्टीलायझर्स, कासेगाव, पंढरपूर यांनी उत्पादित केलेले व मे. व्ही. के. फर्टीलायझर, देहूगाव, हवेली, पुणे व राहुरी, ता. अहिल्यानगर यांनी विपणन केलेले 20:20:00 या ग्रेड मिश्र खताच्या नमुन्यांवर संशय आल्याने ते पुणे येथील खत नियंत्रण प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. प्रयोगशाळेच्या अहवालात खतामध्ये 96 टक्क्यांपेक्षा जास्त माती आढळून आली. म्हणजेच हे खत बोगस होते. तालुक्यातील चार कृषी केंद्रांमध्ये हे खत आढळून आले. त्या 28.50 मे.टन खताला विक्री बंदी आदेश कृषी विभागाने काढले आहेत.
विशेष म्हणजे, मे. महालक्ष्मी फर्टीलायझर (पंढरपूर) कंपनीचा परवाना 17 ऑक्टोबर 2025 रोजी कृषी आयुक्तालय पुणेचे संचालक यांनी रद्द केलेला आहे. तरीही त्या कंपनीच्या नावाने खताची विक्री सुरू होती. गुण नियंत्रण अधिकारी बिरदवडे यांनी दि. 11 फेब्रुवारी रोजी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून व्ही. के. फर्टीलायझरचे व्यवस्थापकीय संचालक तुषार बाबासाहेब गरड (रा. राहुरी) व कोपरगाव तालुका प्रतिनिधी ऋषी हरीश आभाळे (रा. मढी खु., ता. कोपरगाव) यांच्या विरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संदीप सोन्ने करीत आहेत.


